LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

गोंदियात एलसीबीची धडक कारवाई! ५ किलो गांजासह ५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त; महिलेला अटक

डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा येथील घटना
सडक अर्जुनी/गोंदिया:
गोंदिया जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) अंमली पदार्थ विरोधी पथकाने डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध रित्या घरात साठवून ठेवलेला ५.८६६ किलोग्राम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ५ लाख ६६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका ५३ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. अनिता अशोक मोहनकर (वय ५३, रा. फुटाळा, सौंदड, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.


सविस्तर असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २६ जुलै २०२६ रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर रेड कारवाई व पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, मौजा फुटाळा (सौंदड) येथील अनिता मोहनकर ही महिला आपल्या राहत्या घरी बेकायदेशीरपणे गांजा हा अंमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करत असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचासमक्ष अनिता मोहनकर हिच्या राहत्या घराची झडती घेतली. यावेळी घराच्या मध्य खोलीतील एका कोपऱ्यात खाकी रंगाच्या टेपने गुंडाळलेले ५ बंडल आणि प्लास्टिकच्या बोरीत बंद पॉलीथिनमध्ये हिरवा ओलसर पानांचा, फुले व बियांचा मिश्रित गांजा आढळून आला. पोलिसांनी ५.८६६ किलो वजनाचा, एकूण ५,६६,६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात ‘एनडीपीएस’ (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पथकाची धडक कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक जंगमवार, पोहवा तुळशीदास लुटे, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, पोशि सुनील डहाके, राकेश इंदुरकर आणि चापोशि विलास ठाकरे यांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *