आधी हल्ला मग अपहरण अन् धावत्या कारमधून फेकले!
इन्स्टाग्रामवरील वादातून १६ वर्षीय मुलावर चाकूने वार करून डांबले
कारमध्ये डांबून अमानुष मारहाण
सर्व घटनाक्रम आरोपींनी मोबाईलमध्ये केला चित्रित
वर्धा (६ ऑगस्ट) : इन्स्टाग्रामवरील शाब्दिक वादाचा वचपा काढण्यासाठी नागपूरवरून आलेल्या एका युवकाने वर्ध्यातील आपल्या साथीदारांच्या मदतीने एका १६ वर्षीय मुलावर चाकूने सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता, गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलाला बळजबरीने कारमध्ये डांबून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आणि त्यानंतर चालत्या कारमधून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. हे थरारक अपहरणनाट्य आर्वी नाका परिसरात मंगळवारी, दि. ४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अलंकार शैलेश राऊत (१६, रा. पवनार, ह.मु. आर्वी नाका) असे जखमी युवकाचे नाव आहे. तर मारेकऱ्यांमध्ये फैजान शेख (रा. नागपूर), लाला खान (रा. महादेवपुरा) यांच्यासह चार अज्ञातांचा समावेश आहे. अलंकार हा दहाव्या वर्गात शिक्षण घेत असून, त्याच्या मैत्रिणीचा मित्र फैजान शेख याला तो काही दिवसांपासून ओळखतो. मित्राने अलंकारच्या इन्स्टावर फैजानचा फोटो पाठवून तुझ्यापेक्षा स्मार्ट दिसतो, असे लिहून पाठविले होते. अलंकारने त्यावर मेसेज केला. त्यानंतर फैजानने अलंकारला फोन करून शिवीगाळ केली.
असा घडला थरारक घटनाक्रम
मंगळवारी, दि. ४ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास अलंकार आर्वी नाका येथे आत्याच्या घरी असताना त्याला फैजानचा फोन आला आणि भेटायला बोलावले. आर्वी नाका परिसरात अलंकार मित्रासह उभा असताना फैजान हा लाला खान याच्यासोबत आला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात फैजानने चाकू भिरकावला. अलंकारने तो वार चुकविल्याने त्याच्या बोटाला चाकूचा वार बसला.
तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची कार जवळ येऊन थांबली. त्यातून चारजण खाली उतरले आणि अलंकारला लाथाबुक्क्यांनी मारले. तसेच फैजानने चाकूने डोक्यावर वार करत त्याला कारमध्ये डांबून मारहाण करत देहनकर ले-आऊटच्या रस्त्याने जात जुनापाणी चौकात कारमधून त्यास रस्त्याकडेला ढकलून दिले. याबाबतची तक्रार अलंकारने रामनगर ठाण्यात दिली. पोलिसांनी फैजान शेख, लाला खान व त्याच्यासोबत असलेल्या चार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

