LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

गोणीत १२ वर्षांचे अर्ज भरून तरुण पोहोचला जि.प.मध्ये!

न्यायासाठी २०१४ पासून १२ वर्षांचा लढा
अमरावती जिल्हा परिषद कार्यालयातील अनोख्या आंदोलनाने अधिकारी-कर्मचारी अवाक
अमरावती (६ ऑगस्ट) :
महाभारतात पांडवांचा १२ वर्षांचा वनवास संपला होता, परंतु अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाला आपली वडिलोपार्जित जमीन मिळवण्यासाठी २०१४ पासून ते ऑगस्ट २०२६ पर्यंत सलग १२ वर्षे पायपीट करावी लागत आहे. न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या या तरुणाने १२ वर्षांत विविध सरकारी कार्यालयांना दिलेल्या अर्जांच्या प्रती एका गोणीत भरल्या. ही अर्जांची गोणी डोक्यावर घेऊन तो बुधवारी, ५ ऑगस्टच्या दुपारी थेट जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचला. हे दृश्य पाहून तेथील अधिकारी व कर्मचारी अवाक झाले.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर येथील रहिवासी अमोल ठाकरे यांच्या वडिलांच्या नावे गावात दोन ठिकाणी जमीन होती. त्यापैकी एक भूखंड वडिलांच्या तर दुसरा आजीच्या नावे होता. अमोल यांच्या सांगण्यानुसार, आजीच्या नावावरील भूखंडाची नोंदणी दुसऱ्याच एका व्यक्तीने बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावे करून घेतली. याप्रकरणी त्यांनी ११ नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामपंचायत, नांदगाव पंचायत समिती व जिल्हा परिषदेत लेखी तक्रार दाखल केली होती.
न्यायासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीन वेळा आंदोलने केली. तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री, केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडेही निवेदने पाठवली. मात्र, २०१४ पासून ते ऑगस्ट २०२६ पर्यंत त्यांच्या अर्जांची साधी सुनावणीही झाली नाही. अखेर सर्व अर्जांच्या दुसऱ्या प्रती गोणीत भरून अमोल ठाकरे यांनी जिल्हा परिषद गाठली.
पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर सीईओंशी भेट
मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संत्यम गांधी हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये व्यस्त असल्याने अमोल ठाकरे यांना सुमारे पाच तास ताटकळत राहावे लागले. दुपारी १२ वाजता ते जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचले होते, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी भेट झाली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *