HealthLatestगोंदिया- भंडारा

विना नंबरच्या पिकअपमधून ११ गोवंश जनावरांची सुटका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

गंगाझरी पोलिसांची धडक कारवाई!
पोलिसांना पाहून तस्करांची पळापळ
गोंदिया:
जिल्ह्यात बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर आळा घालण्यासाठी गोंदिया पोलीस दलाकडून धडक कारवाई सत्र सुरू आहे. याअंतर्गत गंगाझरी पोलिसांनी बुधवारी (५ ऑगस्ट) गुप्त माहितीच्या आधारे शहरवाणी ते कवलेवाडा मार्गावर नाकाबंदी करून अवैध गोवंश वाहतूक करणारी एक विना नंबरची बोलेरो पिकअप जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ गोवंश जनावरांची सुटका केली असून ११ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाझरी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शहरवाणी ते कवलेवाडा रस्त्याने एका पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक केली जात आहे. माहिती मिळताच ठाणेदार धीरज राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने शहरवाणी ते कवलेवाडा रोडवर नाकाबंदी लावली.
वाहनाच्या डाल्यात डांबले होते ११ गोवंश
नाकाबंदीदरम्यान संशयितरीत्या येणाऱ्या एका विना नंबरच्या बोलेरो पिकअप वाहनाला थांबवून पाहणी केली असता, वाहनाच्या डाल्यात लहान-मोठे ११ गोवंश जनावरे निर्दयतेने बांधून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी लगेच सर्व जनावरांची सुटका केली.
या कारवाईत १ लाख ९५ हजार रुपये किमतीची ११ गोवंश जनावरे आणि १० लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी (इंजिन क्र. TBK1J75022) असा एकूण ११,९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गंगाझरी पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(इ)(ड) सहकलम ५, ६, ९ महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
तपास पथकाची धडक कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (कॅम्प देवरी) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (तिरोडा) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धीरज राजुरकर, पोलीस हवालदार राकेश भुरे, पोलीस शिपाई राजेश राऊत, चित्ररंजनसिंग जनेवार, श्रीकांत नागपुरे आणि चालक पोशि नितीन चांदेवार यांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *