गोंदिया बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती व उपसभापतींवर अविश्वास ठराव दाखल
१८ पैकी तब्बल १३ संचालकांचे बंड; जिल्हाधिकाऱ्यांना सोपवले अविश्वास ठरावाचे पत्र
गोंदिया : गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून विद्यमान सभापती भाऊराव उके व उपसभापती राजकुमार उर्फ पप्पू पटले यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून संचालक मंडळातील १८ पैकी तब्बल १३ संचालकांनी बंड पुकारले असून, यासंदर्भातील अविश्वास ठरावाचे रीतसर पत्र गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांना प्रत्यक्ष सोपवण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, विद्यमान सभापती व उपसभापती बाजार समितीचा कारभार मनमर्जीने हाकत असून कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात संचालक मंडळाला विश्वासात घेत नाहीत. या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी मागच्या मासिक बैठकीतच १३ संचालकांनी बहुमताने ठराव पारित करून सभापती व उपसभापतींचे सर्व आर्थिक व प्रशासकीय अधिकार काढून घेतले होते. तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने संचालकांनी अविश्वास ठराव मांडण्याचे अंतिम पाऊल उचलले आहे.

विशेष सभा बोलावण्याची मागणी:
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम २१-अ आणि नियम १९६७ मधील तरतुदीनुसार हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या ठरावावर विचार व मतदान करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून लवकरात लवकर एका ‘विशेष सभेचे’ आयोजन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
ठरावावर ‘या’ १३ संचालकांच्या स्वाक्षऱ्या:
अविश्वास ठरावाच्या नोटीसवर धनंजय देवभाऊ तुरकर, मुकेश जमनालाल रंगडाले, राजीव रूपचंद ठाकरे, ओमेश्वर सुखदेव चौधरी, चेतनकुमार भैयाभाऊ बत्रेकर, राधाकृष्ण नारायण ठाकूर, सौ. कौशल्या छत्रपाल तुरकर, सौ. श्यामकला जिकलाल पांडे, मुरलीधर भोजराज नागपुरे, अरुण नामदेवराव गजभिये, धनलाल बालचंद ठाकरे, पंकज सुंदरलाल यादव आणि विजय नारायण उके या १३ संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बाजार समितीतील बहुमताचा आकडा (१८ पैकी १३) स्पष्टपणे अविश्वास ठराव आणणाऱ्या गटाकडे दिसत असल्याने विद्यमान सभापती व उपसभापती यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. आता जिल्हाधिकारी यावर विशेष सभा कधी बोलावतात आणि पुढील राजकीय घडामोडी काय होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

