LatestNewsगोंदिया- भंडारा

ब्रिटिशकालीन बोदलकसा धरणाची फुटलेली पाळ पूर्ववत युद्धपातळीवर काम पूर्ण झाल्याने मोठा अनर्थ टळला

गोंदिया: गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत असलेला आणि १९१७ मध्ये बांधकाम पूर्ण झालेला ऐतिहासिक ब्रिटिशकालीन बोदलकसा मध्यम प्रकल्प १०९ वर्षांचा झाला आहे. या धरणाची पाळ १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजता डाव्या कालव्याच्या विमोचकाजवळ फुटल्याची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गोरेगाव-तिरोडा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ज. द. टाले, गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की, जलसंपदा विभागाच्या नागपूर येथील मुख्य अभियंता सोनाली चोपडे आणि भंडारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून फुटलेल्या धरण पाळीची दुरुस्ती करत विसर्ग थांबवण्याचे निर्देश दिले होते.पाच दिवसांच्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश:वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव कुरेकार, उपकार्यकारी अभियंता संजीव सहारे, उपविभागीय अभियंता चंद्रकांत डोंगरे, कनिष्ठ अभियंता अभिषेक यादव तसेच विभागाचे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले. या अथक प्रयत्नांमुळे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता फुटलेल्या धरण पाळीतून होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात यश आले आहे.धरण सुरक्षित, कोणतीही हानी नाही:विसर्ग थांबविण्यात यश मिळाल्यामुळे धरणाच्या खालील भागातील नागरिकांचा धोका टळला आहे. पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियंत्रण केल्यामुळे खालच्या भागातील गावे व शेतीमधील पिकांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. सध्या धरणात ७.८५२ दलघमी म्हणजेच ५०.२४ टक्के जीवित पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच प्रकल्पाच्या मुख्य विमोचकामधून डाव्या कालव्यावरील खरीप सिंचनाचे कार्य सुरळीत सुरू ठेवण्यात आले आहे. आगामी काळात धरणाचे संकल्पन (डिफाइन) पूर्ण करून पाळ फुटलेल्या ठिकाणाचे व सांडव्याचे पुनर्बाधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.लोकप्रतिनिधी व विविध यंत्रणांचे सहकार्य:या आकस्मिक आणि आव्हानात्मक कामात भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे, आमदार विजय रहांगडाले, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, लाक्षेवीचे सचिव, जिल्हाधिकारी गोंदिया यांच्यासह महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे मोलाचे सहकार्य लाभले, ज्यामुळे ही आपत्ती यशस्वीपणे परतवून लावता आली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *