महाका गावात थरार! जेवण करणाऱ्या वृद्धाची डोक्यात काठी मारून निर्घृण हत्या
आरोपीविरुद्ध चिचगड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल
देवरी (गोंदिया): देवरी तालुक्यातील महाका गावात एका दिव्यांगाची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या छपरीत जेवण करत असताना डोक्यावर लाकडी काठीने जबर वार करून वृद्धाचा खून करण्यात आला. या थरारक हत्याकांडामुळे महाका परिसरासह संपूर्ण देवरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
होतीलाल बळीराम बडोले असे मृत वृद्धाचे नाव असून ते उजव्या हाताने दिव्यांग होते. पत्नीच्या निधनानंतर ते महाका, उचेपूर आणि देवरी येथे मुलाकडे आलटून-पालटून राहत असत. मृताचा मुलगा नितेशकुमार बडोले यांनी चिचगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ते स्वतःच्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी गोंदिया येथे जात होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास महाका गावच्या पोलीस पाटलांनी फोन करून “तुझ्या वडिलांना छोटू बंजार याने मारहाण केली असून घरात रक्त सांडले आहे,” अशी माहिती दिली.
माहिती मिळताच नितेशकुमार यांनी तातडीने महाका गाठले. घरात छपरीजवळ जाऊन पाहिले असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि त्यांचे वडील रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून होते. ५ ऑगस्ट रोजी दुपारी ११.३० ते १२.१५ वाजण्याच्या दरम्यान आरोपी छोटू नंदलाल बंजार (वय २५, रा. महाका) याने लाकडी काठीने डोक्यावर जबर वार करून होतीलाल बडोले यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिचगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिचगड पोलीस पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

