एलसीबीचा दणका! घरफोडी करणारा अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
चार जिल्ह्यांतील ६ गुन्ह्यांची उकल; १ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गोंदिया : जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका अट्टल चोराला जेरबंद करण्यात मोठे यश मिळविले आहे. पकडण्यात आलेल्या या सराईत गुन्हेगाराकडून गोंदियातील अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यासह भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल सहा घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला असून, त्याच्याकडून १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०२६ रोजी अर्जुनी-मोर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मौजा बोंडगावदेवी येथील रहिवासी केशव प्रकाश झोळे यांनी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी अर्जुनी-मोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे प्रवीण उर्फ डकैत (वय ३०, रा. टिळक वॉर्ड, मोहाडी, जि. भंडारा) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने अर्जुनी-मोर, साकोली, लाखनी, देसाईगंज आणि रामनगर (जि. चंद्रपूर) परिसरातील घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
१ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त
आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी २५ हजार रुपयांची रोख रक्कम, २५ हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल आणि ६६ हजार रुपये किमतीची होंडा सीबी शाईन मोटारसायकल असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीस पुढील कायदेशीर तपासासाठी अर्जुनी-मोर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदीप खाडे, पोलीस हवालदार तुलसीदास लुटे, अमित तिवारी, प्रकाश गायकवाड, हितेंद्रकुमार दाते, रोशन चेरे, योगेश राऊत, देवेंद्र उके, वंदना बिसेन तसेच पोलीस शिपाई योगेश रहिले, अनिकेत चांदवाडे व अर्पण बजारी यांच्या पथकाने केली.

