police officer : पोलिस अधिकारी यांनी मुलाला दाखल केले जिल्हा परिषदेच्या शाळेत
विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बांधली राखी
गोंदिया : जिल्ह्यातील पंचायत समिती गोंदिया अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दवनीवाडा येथे पोलिस स्टेशन दवनीवाडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजयकुमार टेकाम यांनी आपल्या 3 वर्षाच्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेतील बालवाटीकेच्या नर्सरी कक्षात दाखल करुन शाळेवरील विश्वास, श्रद्धा दाखवून एक अदभुत व अद्वितीय आदर्श घडवून आणला.
मागील एक वर्षापासून शाळा गुणवत्ता विकासासोबतच सामाजिक, भावनिक , राष्ट्रीय बांधिलकी जोपासत आहे. यांत कुटूंबापासून तर अगदी राष्ट्रीयस्तरावरील आपली कर्तव्ये व जबाबदारी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्न करीत आहे. याचाच परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांत शिक्षणाची भिती नाहीशी होऊन सर्व स्तरातील विद्यार्थी आवडीने शाळेत येऊन एकरुप होऊन शिक्षणाचे व संस्काराचे धडे गिरवत आहेत. शाळेतील मुख्याध्यापक टेकचंद चौधरी यांनी जिल्हा स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना जाणवले की, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारुन अमलात आणताना जिल्हा परिषदेच्या शाळांना काही अडचणी येत आहेत. कारण या धोरणात बालवाटीका ते शाळेतील सुरुवातीचे दोन वर्ग अशा प्रकारचा पाच वर्षाचा पायाभूत स्तराचे शिक्षण आहे. लागलीच मुख्याध्यापक यांनी स्थानिक ग्राम पंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचे सहकार्याने गोरगरीब, शेतकरी, मजूर , कामगार, आणि सर्व सामान्यांच्या परिवारातील निरागस बालकांना नाममात्र शुल्कात उशिरा का होईना बालवाटीकेचे शिक्षण सुरू केले. या निर्णयाचे गावात सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.
शाळेतील बालवाटीकेच्या व इतर वर्गाच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या पर्वात पोलिस स्टेशन दवनीवाडा येथील पोलिस निरीक्षक श्रीमती ढाले मैडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री टेकाम साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक श्री राठौड साहेब आणि इतर पोलिस कर्मचारी बांधवांना राखी बांधून सामाजिक बांधिलकी जोपासली. संबंधित पोलिस अधिकारी महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू देऊन एक आदर्श घडवून आणला. देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला शाळेतील कवायत पथकाने शाळा आणि ग्रामपंचायत च्या ध्वजारोहणाचे दिमाखदार संचालन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अशा या शाळेतील बालकांच्या उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगतीला हेरुन पोलिस अधिकारी श्री टेकाम साहेब यांनी आपल्या बालकाला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दाखल केलेत. हि बाब सर्वसामान्यांच्या मनात सकारात्मक घर करणारी आहे. तेवढ्याच पोटतिडकीने मुख्याध्यापकाने बालकाला गोंजारुन प्रवेश दिला. यापुढे शाळेचं विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक उद्दिष्टे टप्प्याटप्प्याने पूर्ण करावयाचे आहेत. ज्यात माझ्या शाळेतील सर्व उच्च शिक्षित शिक्षक, स्थानिक ग्राम पंचायत पदाधिकारी ,पंचायत समिती सदस्य , जिल्हा परिषद सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावस्तरावर मोठे सहकार्य लाभत आहे, हे अभिमानास्पद आहे.

