LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

छत्तीसगड सीमेवर लाखांच्या सागवान तस्करीचा पर्दाफाश!

एटापल्ली वनपरिक्षेत्राची मोठी कारवाई : कोळशाच्या पोत्यांआड लपवून नेला जाणारा ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
अंधाराचा फायदा घेऊन १५ ते १६ संशयित पसार; चिखलात रुतलेला ट्रक बाहेर काढण्यात वनविभागाला यश
एटापल्ली (गडचिरोली) :
येथील वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोहुर्ली उपवन क्षेत्रात छत्तीसगड सीमेजवळ वन विभागाने १ ऑगस्ट रोजी रात्री सागवान तस्करी उघडकीस आणली आहे. या धडक कारवाईत कोळशाच्या पोत्यांआड लपवून नेला जाणारा तब्बल ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून १५ ते १६ संशयित पसार झाल्याची माहिती आहे.
मोहुर्ली जंगलातून सागवान लाकडाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वनरक्षक राकेश मडावी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटापल्ली वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित ट्रक जप्त केला. तस्करांनी पोलीस व वनविभागाची दिशाभूल करण्यासाठी ट्रकमध्ये कोळशाची पोती भरून त्यावर ताडपत्री टाकली होती, जेणेकरून सर्व काही सामान्य असल्याचा आव आणता येईल.
चिखलातून काढला ट्रक बाहेर
जप्त करण्यात आलेला ट्रक (AP 21 TA- 6954) एटापल्ली वनपरिक्षेत्राकडे आणत असताना जंगलातील रस्त्यावर चिखलात रुतल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, वनविभागाने मोठी कसरत करत हा ट्रक सुरक्षितपणे चिखलातून बाहेर काढला.
यांनी केली कारवाई
या कारवाईत क्षेत्र सहाय्यक बी. डी. नागोसे, बी. डी. राठोड, वनरक्षक राकेश मडावी यांच्यासह सचिन ताराम, अर्जुन वेळदा, कैलास मडावी, अमर कन्नाके, पुरुषोत्तम सोयाम, सैनू हिचामी, डी. एस. हालामी, इरफा आत्राम, आरती उईके व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *