थरारक चोरी; एटीएममधील १२ लाख लुटले, नंतर अख्खे मशीनच पेटवले!
खरांगणा (मोरांगणा/ वर्धा ) येथील घटना; एटीएम चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके झाली रवाना
पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी लावली आग; संपूर्ण मशीन जळून कोळसा
खरांगणा (मोरांगणा) : पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी वापरलेली एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर शक्कल समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी खरांगणा बसस्थानकाजवळ असलेल्या एका एटीएम केंद्रावर दरोडा टाकून तब्बल १२ लाख २२ हजार रुपयांची रक्कम लांबास केली. एवढ्यावरच न थांबता, चोरीचा कोणताही सुगावा किंवा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागू नये, या उद्देशाने चोरट्यांनी संपूर्ण एटीएम मशीनच पेटवून देऊन ते खाक केले.
ही घटना १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १.३० वाजनाच्या सुमारास घडली. या थरारक घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दीड वाजनाच्या सुमारास वर्दळ नसलेले एटीएम केंद्र गाठले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एटीएम मशीन फोडून त्यातील १२ लाख २२ हजारांची रोकड सुरक्षितपणे बाहेर काढली. त्यानंतर आपली ओळख लपवण्यासाठी व पुरावे मिटवण्यासाठी चोरट्यांनी ज्वलनशील पदार्थाचा वापर करून एटीएम मशीनला आग लावली. एटीएमचे शटर कटरने कापून चोरट्यांनी आत प्रवेश करत हा कारनामा केला.
मशीनचा कोळसा, चोरट्यांचा शोध सुरू…
१. आग एवढी भीषण होती की, संपूर्ण मशीन जळून कोळसा झाली पकेबिनचेही मोठे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून शिताफीने ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
२. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील इतर रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. यासाठी विविध पथके रवाना झाली आहेत.
पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच एसपी सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, एसडीपीओ डॉ. वंदना कारखेले, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यांच्यासोबत दीपक साळुंखे, मनीष श्रीवास, सौरभ अंबाडे, अमर करणे, उमेश गेडाम, अविनाश नवराते यांच्यासह फॉरेन्सिक पथक, डॉगस्कॉडच्या पथकाने पाहणी केली.
पाण्याचा मारा अन् आगीवर नियंत्रण
मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास वर्धा येथील नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याची माहिती मिळाली. अग्निशमन अधिकारी अशोक लोखंडे, फायरमन मयूर सोनवणे, वाहन चालक प्रदीप तराळे यांनी घटनास्थळी जात आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवली. पाहणीदरम्यान एटीएम केंद्राबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरही स्प्रे मारल्याचे दिसून आले.

