LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

कावेरी आंदोलनासाठी नागपूरमार्गे दिल्लीकडे जाणारे २३ शेतकरी ताब्यात!

जीटी एक्सप्रेसमधून उतरवले : नागपूर रेल्वेस्थानकाला आले छावणीचे स्वरूप, जंतर-मंतरवर करणार होते आंदोलन
तामिळनाडूतील शेतकऱ्यांना नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून परत चेन्नईला पाठवले
नागपूर (३ ऑगस्ट) :
तामिळनाडूतील २३ शेतकऱ्यांना कावेरी नदीवरील पाणीवाटप आणि मेकेदाटू धरण प्रकल्पाविरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनासाठी जात असताना रविवारी सकाळी ११:३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते, आणि शेतकऱ्यांना चेन्नईला परत पाठवण्यात आले.
कावेरी नदीवर मेकेदाटू धरण बांधण्याची कर्नाटकची मागणी आहे. या धरणामुळे बंगळुरूसाठी पिण्याच्या पाण्याचा साठा होईल आणि पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी साठवता येईल, असा कर्नाटकचा दावा आहे. तर हे धरण झाल्यास कावेरीचे पाणी खालील प्रवाहात कमी पोहोचेल आणि राज्यातील शेतकरी व सिंचनावर परिणाम होईल, अशी तामिळनाडूतील शेतकऱ्यांना भीती असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस ताफा तैनात
या धरणाला विरोध करण्यासाठी तामिळनाडूतील २३ शेतकरी रेल्वेगाडी क्रमांक १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्सप्रेसने दिल्ली येथे जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी जात होते. याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस, शहर पोलीस मोठ्या संख्येने नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जमा झाले.
जीटी एक्सप्रेस येताच या गाडीतील २३ शेतकऱ्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना परत चेन्नईला पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. दरम्यान, जीटी एक्सप्रेस नागपूरला येण्यापूर्वी आणखी काही शेतकऱ्यांना विविध रेल्वेस्थानकांवर उतरवण्यात आल्याची माहिती आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *