LatestNewsगोंदियाविदर्भ

प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यातच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू!

पतीला अटक : मुलीची हत्या केल्याचा वडिलांचा गंभीर आरोप
मृत्यूचे गूढ अधिक गडद : साखरा शिवारातील घटना
वरोरा (चंद्रपूर) :
वरोरा तालुक्यातील साखरा शिवारात प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यात एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (दि. २ ऑगस्ट) विवाहितेचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणात मृत महिलेच्या वडिलांनी हा आत्महत्या नसून हत्येचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पती महेश गुलाब कावले विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मयुरी हरिदास सुपारे (वय २६, रा. खेक, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साखरा येथील महेश गुलाब कावले याच्याशी मयुरीचे प्रेमसंबंध होते. मयुरी गरोदर राहिल्यानंतर मे महिन्यात दोघांनी प्रेमविवाह केला होता.
प्रेमविवाहानंतर छळ अन् अनधिकृत गर्भपात?
मयुरीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहानंतर तिचा जबरदस्तीने अनधिकृत गर्भपात करण्यात आला आणि त्यानंतर सासरी तिझा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. येथील एका खाजगी डॉक्टरकडे हा अनधिकृत गर्भपात करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे.
महेश कावले हा बुटीबोरी येथील एका खाजगी कंपनीत कार्यरत असल्याने दोघे काही काळ तेथे वास्तव्यास होते. त्यानंतर महेशने मयुरीला माहेरी सोडल्याचे तक्रारीत नमूद आहे. २ ऑगस्ट रोजी महेशने मयुरीला साखरा येथे बोलावले. त्यानुसार तिचा भाऊ चेतन सुपारे याने सकाळी सुमारे ९:३० वाजता तिला साखरा येथे सोडले.
त्यानंतर दुपारी ३ वाजता साखरा शेतशिवारातील झाडाला एका महिलेने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. मृत महिलेच्या वडिलांनी मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला असून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *