बापट चौकात थरार, तरुणाचा खून; तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत बेड्या!
पैशांच्या वादातून ३१ वर्षीय तरुणावर चाकूने वार; अमरावती शहरातील बापट चौक परिसरातील घटना
मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल; गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांची धडक कारवाई
अमरावती (४ ऑगस्ट) : पैशांच्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना अमरावती शहरातील बापट चौक परिसरात घडली. शरीफ बैग रशीद बैग (वय ३१, रा. लालखडी, अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे. २ ऑगस्ट रोजी रात्री १०:४५ च्या सुमारास हा खुनी थरार घडला. घटनेच्या अवघ्या काही तासांतच तिन्ही आरोपींना गजाआड करण्यात गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांना यश आले आहे.
शेख रेहान शेख हारून (२७, रा. सुफियान नगर) व शेख नुरेन शेख इरफान (२१, रा. सबा नगर) या दोघांना गुन्हे शाखेने, तर इरफान खान उर्फ गोलू जावेद खान (२७, रा. अकबर नगर) याला कोतवाली पोलीस पथकाने अटक केली.
या प्रकरणी मृतकाचा लहान भाऊ अहमद बैग रशीद बैग (२५, रा. लालखडी) याने फिर्याद नोंदवली. त्यानुसार ३ ऑगस्ट रोजी पहाटे ३:३८ च्या सुमारास तीन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी शरीफ बैग याच्यावर धारदार शस्त्राने वार केले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डीसीपी श्याम घुगे यांच्यासह कोतवालीचे ठाणेदार रोशन शिरसाट यांनी घटनास्थळ गाठले.
अशी घडली घटना
शरीफ बैग हा रविवार, २ ऑगस्टला रात्री १० वाजताच्या सुमारास मजुरीचे काम आटोपून घरी परतला. फ्रेश झाल्यानंतर ‘बाहेर जाऊन येतो,’ असे सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतर रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास शरीफ याच्यावर बापट चौकाजवळ काही जणांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. माहिती मिळताच भावाने व नातेवाईकांनी इर्विन रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या शरीफची प्राणज्योत मालवली.
पोलिसांनी अवघ्या ३ तासांत ठोकल्या मुसक्या
पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व अतुल वर यांच्या ‘टीम क्राईम’ने दोन आरोपींना अर्ध्या रात्रीच ताब्यात घेतले. तर कोतवालीचे ठाणेदार रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वातील डीबी पथकाने तिसऱ्या आरोपीस पसार होण्यापूर्वीच ताब्यात घेतले.

