जि.प. तील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात; ४५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
गोंदिया : सेवानिवृत्तीची कागदपत्रे लवकर तयार करून देण्याच्या आणि १ लाख ९२ हजार रुपयांची रिकव्हरी वाचवून देण्याच्या मोबदल्यात ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोंदिया जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी (११ मे) रंगेहात पकडले. संदेश सांभरे असे या लाचखोर लिपिकाचे नाव असून या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे गोंदिया जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. निवृत्तीनंतरचे लाभ मिळवण्यासाठी त्यांना आपली सेवानिवृत्तीची कागदपत्रे तयार करायची होती. यासाठी त्यांनी जि.प. च्या लेखा विभागात कनिष्ठ लिपिक असलेल्या संदेश सांभरे यांच्याकडे आपला प्रस्ताव रीतसर सादर केला होता.
काम लवकर व्हावे या प्रतीक्षेत असलेल्या तक्रारदाराला ७ मे रोजी आरोपी सांभरे याने गाठले. त्यांच्या प्रकरणात पे-फिक्सेशन (वेतन निश्चिती) बरोबर नसल्याचे सांगून त्यांच्यावर तब्बल १ लाख ९२ हजार रुपयांची रिकव्हरी निघत असल्याची भीती त्याने दाखवली. ही रिकव्हरी पूर्णपणे वाचवून देण्यासाठी आणि सेवानिवृत्तीची सर्व कागदपत्रे विनाअडथळा तातडीने तयार करून देण्यासाठी सांभरे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
………………………
असा रचला सापळा
तक्रारदाराची लाच देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी थेट गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) कार्यालय गाठले. सोमवारी, ११ मे रोजी त्यांनी सांभरे याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची तत्काळ दखल घेत एसीबीच्या पथकाने पडताळणी केली आणि सोमवारी दुपारीच जि.प. कार्यालयात सापळा रचला.
लाचेच्या रकमेवर तडजोड झाल्यानंतर, ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी संदेश सांभरे याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. वृत्त लिहिस्तोवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

