३०० कोटींच्या उड्डाणपुलाला ३ वर्षांतच गळती; पिलरमधून वाहतेय पाणी, महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार!
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील ६ पदरी पुलाच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
साकोली (भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील साकोली शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ३०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ६ पदरी उड्डाणपुलाच्या (ओव्हरब्रिज) गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या तीन वर्षांतच या कोट्यवधींच्या पुलाला गळती लागली असून पावसाळ्यात पुलाच्या पिलरमधून पाण्याचे मोठे लोट वाहत आहेत. २९ मार्च २०२२ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मोठ्या थाटात लोकार्पण झालेल्या या महत्त्वाकांक्षी पुलाची झालेली दैना अत्यंत चिंताजनक ठरत आहे.या ओव्हरब्रिजच्या निर्मितीमुळे साकोली शहरातील मुख्य मार्गावरील जड वाहनांची कोंडी सुटून स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या तीन वर्षांतच पुलाच्या पिलरमधील भेगांमधून पाण्याचा विसर्ग अतिशय वेगाने होत आहे.

विशेषतः पिलर क्रमांक ४५, ४६ आणि ६६ मधील जॉइंट्स सुटले असून त्यामधून पावसाचे पाणी थेट नळाच्या धारेप्रमाणे खाली जमिनीवर वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पृष्ठभागावरील डांबरी थर उखडला; अपघाताची भीतीपाण्याच्या सततच्या धारेमुळे केवळ पिलरच नव्हे, तर पुलाच्या अगदी वरच्या पृष्ठभागावरील (सरफेस) डांबरी थर अनेक ठिकाणी उखडला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या आतच हा राष्ट्रीय स्तरावरील पूल मेंटेनन्स आणि दुरुस्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्यामुळे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदार कंपनीच्या निकृष्ट कार्यप्रणालीवर आणि महामार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीवर तीव्र शंका उपस्थित होत आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे शहरातील नागरिक व वाहनचालक स्वतःच्या सुरक्षेबाबत कमालीचे धास्तावले आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणानुसार संबंधित कंत्राटदार कंपनीला दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच उड्डाणपुलाची पाहणी करून तातडीने देखभाल व दुरुस्ती करणे अनिवार्य असते. मात्र, मागील तीन वर्षांपासून सातत्याने गळती होत असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. आता साकोली नगर परिषदेमार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अधिकृत पत्र पाठवून पुलाची तातडीने आणि दीर्घकालीन दुरुस्ती करून घेण्याबाबत कडक सूचना दिल्या जाणार आहेत.

