आश्रमशाळेतील अन्नातून विषबाधा : ६६ विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; तिघांवर उपचार सुरू!
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी घेतली रुग्णालयात भेट; आश्रमशाळेची पाहणी करून दिले कडक निर्देश
धारणी (अमरावती) : धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेत अन्नातून झालेल्या विषबाधेच्या घटनेत बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढून ६९ वर पोहोचली आहे. शनिवारी रात्री धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६६ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रविवारी दुपारी रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आली. उर्वरित तीन विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.दरम्यान, रविवारी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली व डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेतली. त्यानंतर मंत्री उईके यांनी टिटंबा येथील आश्रमशाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते कडक निर्देश दिले.
शनिवारी सायंकाळी अन्नातून विषबाधा; बेड कमी पडल्याने एकाच बेडवर २-३ विद्यार्थीशनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चक्कर येणे, उलट्या होणे आणि मळमळण्याचा त्रास सुरू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून टिटंबा गावातील नागरिकांनी उपलब्ध वाहनांतून विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. रात्री ११ वाजेपर्यंत सर्व ६९ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने रुग्णालयात एकाच बेडवर दोन ते तीन विद्यार्थ्यांवर उपचार करावे लागले.घटनेची माहिती मिळताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी शनिवारी रात्रीच रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. वेळेवर उपचार सुरू झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

खासदार वानखडे यांनी घेतला आढावा; मुख्याध्यापक व अधीक्षकांवर निलंबनाची कुऱ्हाड?
या घटनेनंतर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी रविवारी सकाळी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. निष्काळजीपणाबद्दल त्यांनी मुख्याध्यापक, अधीक्षक आणि शिक्षकांची चांगलीच कानउघाडणी केली. निष्काळजी ठरलेल्या मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांना दिले.त्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यावेळी माजी आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार प्रदीप शेवाळे, ठाणे प्रभारी अवतारसिंग चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, बाजार समिती सभापती रोहित पटेल, नगरसेवक पंकज मोरे, राजा खान उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दयाराम जावरकर यांनी ६६ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज दिल्याची माहिती दिली.

