नागपुरात आंतरराज्यीय केबल चोर टोळी गजाआड; हायड्रा क्रेनसह ८६ लाखांचा माल जप्त!
गुन्हे शाखा युनिट-३ ची मोठी कारवाई; दिल्ली आणि यूपीच्या ९ सराईत गुन्हेगारांना बेड्या
नागपूर : शहरात सरकारी केबल चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घालणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ला मोठे यश आले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी टोळीच्या ९ मुख्य सूत्रधारांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीची केबल, हायड्रा क्रेन आणि आयशर टेम्पोसह एकूण ८५ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या काही दिवसांत केबल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या टोळीला ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी लकडगंज आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या केबल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. याशिवाय, हे आरोपी २०२३ मध्ये सदर आणि मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांमध्येही पोलिसांना हवे होते.
हाय-टेक क्रेन आणि टेम्पो जप्त अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी हे दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील सराईत गुन्हेगार आहेत. ते रस्त्यावरील बीएसएनएल कंपनीच्या महागड्या केबलवर पाळत ठेवून क्रेनच्या साहाय्याने चोरी करत असत. पोलिसांनी त्यांच्याकडून ४० लाख रुपयांची हायड्रा क्रेन, ३० लाख रुपयांचा आयशर टेम्पो, १५ लाख रुपये किमतीचे बीएसएनएल कंपनीचे चोरीचे केबल आणि ७ मोबाईल फोन जप्त केले आहेत.
हे आहेत अटक केलेले आरोपी: सरताज शाहिद हुसैन (३७, दिल्ली), परवेज मुसा खान (२७, नवी दिल्ली), मोहम्मद राजा मो. पप्पू (२२, दिल्ली), अजय जगदीश कुमार (२३, दिल्ली), राजाबाबू रहीम खान (२५, दिल्ली), दिनेश गुमान रजक (२०, दिल्ली), मिथिलेश रामबहादुर यादव (४२, दिल्ली), बलराम प्रेमपाल कश्यप (३५, उत्तर प्रदेश) आणि आकाश सत्यप्रकाश कुमार (२०, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सर्व आरोपींना जप्त केलेल्या मालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या टोळीकडून आंतरराज्यीय स्तरावरील केबल चोरीचे आणखी काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

