NNTR : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा स्थापना दिन साजरा
गोंदिया : भंडारा गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पास दिनांक १२ डिसेंबर २०१३ रोजी भारतातील ४६वा तर महाराष्ट्रातील ५ वा व्याघ्र प्रकल्प म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. येथील घनदाट वने, विविध प्रकारचे वन्य प्राणी, स्थलांतरण करणारे वेगवेगळया प्रजातीचे पक्षी यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची ख्याती जगप्रसिद्ध आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या १२ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून व्याघ्र प्रकल्प स्थापन झाल्यापासून व्याघ्न प्रकल्पाच्या बहुउद्देशीय विकासामध्ये ज्या वनाधिकाऱ्यांनी महत्व पूर्ण योगदान दिले यांच्या उपस्थितीत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडून विशेष कार्यशाळेचे आयोजन दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते.
श्रीमती, पियुषा जगताप क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा (NNTR) व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांनी वन्यजीव अधिवास व्यवस्थापन, संरक्षण धोरण, वन्यजीव मार्गाशी संबंधित समस्या, वन पर्यटनावरील ताण, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची क्षमता व प्रशिक्षणाची गरज, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राचा विस्तार करणे, वन्यप्राणी व्यवस्थापन, मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि वनपर्यटन उपक्रम वाढवून स्थानिक लोकांकरीता रोजगार निर्मिती करणे इत्यादी विविध विषयांवर यापूर्वी या व्याघ्र प्रकल्पाच्या विकास कामांमध्ये सहभागी वन अधिकाऱ्यांकडुन आवश्यक मार्गदर्शन घेण्याबाबत या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले.
श्री. रामानुजन मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त (तत्कालीन क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक), श्री. एस. एल. ठवरे, सेवा निवृत्त (तत्कालीन क्षेत्र संचालक), श्री. उत्तम सावंत, प्रादेशिक व्यवस्थापक FDCM नागपूर प्रदेश (तत्कालीन विभागीय वन अधिकारी), श्री. नंदकिशोर काळे AIG, NTCA (तत्कालीन सहायक वनसंरक्षक), श्री. प्रमोदकुमार पंचभाई, उपवनसंरक्षक मुल्यांकन विभाग नागपूर (तत्कालीन सहायक वनसंरक्षक), श्री. पवन जोंग उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग, श्री. तुषार ढमढेरे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनिकरण विभाग गोंदिया (तत्कालीन विभागीय वन अधिकारी), श्रीमती. रुपाली सावंत, विभागीय वन अधिकरी जैवविविधता मंडळ नागपूर (तत्कालीन सहायक वनसंरक्षक), श्री. अजय पिल्लरीशेट, सेवा निवृत्त विभागीय वन अधिकारी (तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी) श्री. विजय धांडे, सहायक वनसंरक्षक गोंदिया (तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी), श्री. सचिन डोंगरवार, सहायक वनसंरक्षक गोंदिया (तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी), वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सदाशिव अवगान, श्री. सचिन जाधव, श्री. दिलीप कौशिक, तसेच सध्या कार्यरत सर्व वन अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यशाळेमध्ये वरील विषयांवर विचार मंथन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी नवेगाव नागझिरा व्याघ्र (NNTR) प्रकल्पातर्फे हजर वनअधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून गोंडो आदीवासी चित्रकलेची फोटो फ्रेम व सारस पक्षी संवर्धन क्षेत्रातील सेंद्रिय तांदूळ भेट स्वरुपात क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांचे हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. प्रितमसिंग कोडापे उपसंचालक नवेगाव नागझिरा व्या/ प्रकल्प यांनी केले.

