आषाढी एकादशीनिमित्त टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन
तिरोडा (गोंदिया ) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण तिरोडा शहरात भक्तीमय आणि अत्यंत उत्साही वातावरणात श्री विठ्ठल-रुक्मिणी पालखी महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. माँ अंबे महिला मंडळ, श्रीराम गजानन राधाकृष्ण मंदिर देवस्थान आणि श्रीराम नवमी शोभायात्रा नगर उत्सव समिती, तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.स्थानिक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे व पालखीचे विधिवत पूजन करून पालखीचे नगर परिक्रमेसाठी प्रस्थान झाले. हातात टाळ, मृदंग, हाती पताका आणि मुखी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ चा गजर करत निघालेल्या या दिंडीमुळे संपूर्ण तिरोडा शहर भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. या पालखी सोहळ्यात महिला, तरुण, बालके आणि वयोवृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवली.शहरातील मुख्य मार्गावरून भ्रमण करत पालखी श्रीराम गजानन राधाकृष्ण मंदिरात पोहोचली. तेथे विठूरायाची भव्य महाआरती करण्यात आली. आरतीनंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक परंपरा, सामाजिक एकता आणि अखंड भक्तीभावाचे प्रतीक असलेल्या या पालखी महोत्सवाचे तिरोडा शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले.
तिरोड्यात अवतरली ‘पंढरी’
आषाढी एकादशीनिमित्त तिरोडा शहरात निघालेल्या पालखी सोहळ्याने वारकरी संप्रदायाचा उत्साह द्विगुणित केला. महिलांचे फुगड्यांचे खेळ, बाल वारकर्यांचा उत्साह आणि टाळ-मृदंगाच्या गजराने काही काळासाठी तिरोडा शहरातच पंढरी अवतरल्याचा भास होत होता.


