नागपूर-जबलपूर महामार्गावरील उड्डाणपुलाला वर्षभरातच भगदाड; मनसर येथील प्रकार!
बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; महामार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता बळावलीदुरुस्तीकडे दुर्लक्ष करत कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याची स्थानिक नागरिकांची जोरदार मागणी
रामटेक (नागपूर) : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर (ता. रामटेक) येथील चौकात असलेल्या उड्डाणपुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले असून, पुलाच्या बांधकामात वापरलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. हे भगदाड जबलपुर-नागपूर लेनवर पडले असून, या पुलाचे बांधकाम अवघ्या वर्षभरापूर्वीच करण्यात आले होते. त्यामुळे पुलाच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अपघाताची शक्यता बळावली आहे.हा महामार्ग मनसर गावाच्या मध्यभागातून गेला असून, येथे २४ तास वाहनांची प्रचंड वर्दळ असते.

मनसर येथील व्यापारी प्रतिष्ठाने याच महामार्गाच्या दोन्ही बाजूला असल्याने ग्राहकांचीही गर्दी असते. येथील रहदारी सुरळीत करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे बांधकाम करून वर्षभरापूर्वी तो वाहतुकीस मोकळा करण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी या पुलाच्या मध्यभागी खड्डा तयार होऊन वाहनांच्या चाकांमुळे त्याचा आकार आणि खोली वाढली. सिमेंट काँक्रीट निघाल्याने लोखंडी सळ्या स्पष्ट दिसू लागल्या आहेत.वाहतूक सुरूच, जुजबी उपाययोजनांवर भरपुनावरील भगदाड लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन पाहणी केली, मात्र प्रभावी उपाययोजना करून वाहतूक पूर्णपणे बंद करण्याऐवजी केवळ जुजबी उपाययोजना केल्या आणि वाहतूक सुरूच ठेवली.संभाव्य अपघात टाळण्यासाठी जबलपूर-नागपूर लेनवरील वाहतूक बंद करून ती नागपूर-जबलपूर लेनवर वळवणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता भगदाड पडलेल्या लेनवर लाल पट्ट्या लावून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या पट्ट्या चालकांना स्पष्ट दिसत नसल्याने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.निकृष्ट बांधकाम व कंत्राटदारावर कारवाईची मागणीहा उड्डाणपूल चौपदरी असून, त्याला दोन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रीटचे दुभाजक व कमी उंचीची सुरक्षा भिंत तयार केली आहे. या पुलावरून जड व ओव्हरलोड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. प्रत्यक्ष पाहणीत पुलाच्या बांधकामात कमी जाडीच्या लोखंडी सळ्या वापरल्याचे आणि दोन सळ्यांमधील अंतर अधिक असल्याचे दिसून आले आहे. शिवाय स्लॅबची जाडीही कमी असल्याचे आढळले आहे. या प्रकारामुळे स्थानिक व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, पुलाच्या बांधकामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आणि संबंधित कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ (काळ्या यादीत) टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

