LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

सिम्बायोसिसच्या मागे झुडपांत आढळला रक्ताने माखलेला तरुणाचा मृतदेह; २ जणांना अटक

हत्या प्रकरणातील आरोपीची दगडाने ठेचून निघृण हत्या
वाठोडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या
नागपूर (८ ऑगस्ट) :
हत्येच्या प्रकरणात जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या एका २० वर्षीय तरुणाच्या डोक्यावर जड दगडाने वार करून त्याची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतीक उर्फ आदी राजू करंडेकर (२०, रा. प्लॉट क्र. २५, गंगाबाग, दुर्गा चौक, पारडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सिम्बायोसिस कॉलेजच्या मागील झुडपांमध्ये त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाठोडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासचक्रे फिरवत आवेज इक्बाल शेख (१९, रा. प्लॉट क्र. ३०३, देशपांडे ले-आऊट) आणि शाकीब शेख अब्दुल कलाम (२६, रा. जयभीम चौक, हिवरीनगर) या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २०२५ मध्ये एचबी टाऊन परिसरात घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी प्रतीक आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वीच प्रतीक आणि त्याचे सह-आरोपी जामिनावर बाहेर आले होते. गुरुवारी सायंकाळी प्रतीक दुचाकी घेऊन घरातून निघाला होता, मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी सिम्बायोसिस कॉलेजमागील झुडपांत त्याचा मृतदेह आढळला. मृत प्रतीकाचा मोठा भाऊ अपेक्षित कारंडेकर याच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
वाहनाचा कट लागल्याच्या वादातून घडला खून
वाठोडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत मुख्य आरोपी आवेज इक्बाल शेख याने गुन्ह्याची कबुली दिली. काही काळापूर्वी मृत प्रतीकच्या गाडीचा आरोपीच्या वाहनाला कट लागला होता. या जुन्या वादातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. याच जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी प्रतीकला निर्जन स्थळी नेऊन दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *