पावसाळ्यातही बल्लारपुरात महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई; तांत्रिक बिघाडामुळे नागरिक त्रस्त!
वर्धा नदीकाठावरील नवीन पाणीपुरवठा योजना ठरतेय अपयशी; ११ हजार नळधारकांना पाणी मिळणे कठीणवीजपंपामधील बिघाड अन् वीजपुरवठा खंडित झाल्याने अडथळे; एक दिवसाआड पाणी दिल्याने महिलांची मोठी धावपळ
बल्लारपूर (२६ जुलै) : कागद कारखाना, कोळसा खाणी आणि अनेक मोठ्या उद्योगांमुळे ओळखले जाणारे बल्लारपूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे व दाट लोकवस्तीचे शहर आहे. मात्र, गेल्या २५ दिवसांपासून या औद्योगिक शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वर्धा नदीच्या काठावरील नवी पाणीपुरवठा योजना शहरातील ११ हजार नळधारकांची तहान भागवण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे. कधी वीजपुरवठा खंडित होणे, तर कधी पंपातील तांत्रिक बिघाड यामुळे शहराला थेट एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे शहराला नियमित आणि शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी आहे; परंतु अब्जावधी रुपये खर्च करून उभारलेली नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शहरात आधीच दररोज केवळ एकच तास पाणी दिले जात होते, त्यातच १ जुलैपासून तांत्रिक अडचणींचे ग्रहण लागल्याने पाणी थेट एक दिवसाआड करण्यात आले. दाट लोकवस्ती असलेल्या डेपो, वस्ती आणि टेकडी परिसरात पाळीपाळीने पाणी सोडले जाते, मात्र ते अत्यंत अपुरे पडत आहे. मुख्य पाणीपुरवठा केंद्रावरील तीनपैकी दोन मोठे पंप अचानक बिघडल्यामुळे ही गंभीर समस्या निर्माण झाली. दोन पंप दुरुस्त करण्यात यश आले असले तरी एक पंप अद्यापही बंदच आहे.वीजपुरवठा वारंवार खंडित; दैनंदिन दिनक्रम कोलमोडलात्यातच भर म्हणजे, २४ जुलैच्या रात्रीपासून वर्धा नदीकाठच्या उपसा केंद्रावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी उपशात मोठा अडथळा येत आहे. चंद्रपूर येथून तज्ज्ञ अभियंते बिघडलेला पंप दुरुस्त करण्यासाठी आले असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.औद्योगिक शहर असल्याने येथे कामगार व सर्वसामान्य नागरिकांची मोठी संख्या आहे. सततच्या पाणीटंचाईमुळे दैनंदिन दिनक्रम कोलमोडला असून, विशेषतः महिलावर्गाला पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून शहराला सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महिलांची आक्रमक मागणी व संतप्त प्रतिक्रियाबल्लारपुरातील अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने ही समस्या तातडीने दूर करावी, अशी मागणी शहरातील शेकडो महिलांनी केली आहे.

