वर्गणी गोळा करण्याआधी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक
गोंदिया : राज्यभरात गणेश मंडळाची तयारी सुरु झाली आहे. मात्र, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी किंवा देणगी गोळा करतांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पुर्व परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1950 चे कलम 41-क नुसार कोणतेही सार्वजनिक उत्सव साजरे करण्याकरीता नागरिक व भाविकांकडून वर्गणी गोळा करतांना सहाय्यक धर्मादाय आयुक्त, गोंदिया यांची पुर्व परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.
विना परवानगी वर्गणी गोळा करणे हा गुन्हा आहे. परंतु असे निदर्शनास आले आहे की, गोंदिया जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गा, शारदा उत्सव साजरा करण्याकरीता सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पुर्व परवानगी न घेता वर्गणी गोळा करतात. तसेच लॉटरी काढणे, लकी ड्रॉ काढणे असे प्रकार काही संस्थाकडून होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तरी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1950 चे कलम 41-क नुसार मंडळाने या कार्यालयाची परवानगी घेतली आहे किंवा नाही हे तपासल्याशिवाय संबंधित प्राधिकरणाकडून कोणतीही परवानगी देवू नये, जेणेकरुन संबंधित मंडळांकडून होणारा आर्थिक गैरव्यवहार तसेच अन्य घटना भविष्यात झाल्यास सदर मंडळांवर मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1950 चे कलम 66 नुसार तीन महिने कारावास व वसुल केलेले दंडाच्या वर्गणीच्या तीन पट रक्कम वसुल करण्यात येईल. तरी संबंधितांनी सदर नियमाचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पजई यांनी केले आहे.


Pingback: बेरोजगारांसाठी सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन व सर्विसेस व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण - Navchaitanya