LatestNewsविदर्भ

भामरागडमध्ये माओवादी पत्रक आढळल्याने खळबळ; तर एटापल्लीत माओवाद्यांच्या नावाने दहशत पसरवणारे दोघे जेरबंद!

भामरागड तालुक्यात ‘जल, जंगल, जमिनी’साठी एल्गार; २६ ते ३० जुलै दरम्यान पाळल्या जाणाऱ्या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क

भामरागड / एटापल्ली (२६ जुलै) : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागांमध्ये अचानक माओवादी पत्रके आणि पोस्टर्स आढळल्याने पोलीस यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे. भामरागड तालुक्यातील हिड्डूर-दोबूर मार्गावर २५ जुलै रोजी सायंकाळी कथित माओवादी पत्रक आणि लाल रंगाचे कापडी पोस्टर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भामरागड तालुका मुख्यालयापासून अवघ्या ९ किलोमीटर अंतरावर हे पत्रक टाकण्यात आले आहे. दरवर्षी २६ ते ३० जुलै दरम्यान माओवाद्यांच्या वतीने पोलीस कारवाईत ठार झालेल्यांच्या स्मरणार्थ ‘स्मृती सप्ताह’ पाळला जातो. या सप्ताहाच्या पूर्वसंध्येलाच हे पत्रक आढळल्याने सुरक्षा दलांकडून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.कंपन्यांचा शिरकाव आणि पोलीस ठाण्यांवर आक्षेपमाओवाद्यांनी टाकलेल्या या पत्रकात जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. या लढ्यात मारल्या गेलेल्या सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात येऊ घातलेल्या खाजगी कंपन्यांचे उद्योग आणि पोलीस ठाण्यांच्या वाढत्या जाळ्यावर कडाडून आक्षेप घेण्यात आला आहे.पिपली बुर्गीत माओवाद्यांच्या नावाखाली दहशत माजवणारे दोघे अटकेतदुसरीकडे, एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ जुलै रोजी माओवादीसदृश पत्रके आणि लाल रंगाचे कापडी बॅनर लावून दहशत माजवणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनी २४ जुलै रोजी जेरबंद केले आहे. पिपली बुर्गीपासून ५ किमी अंतरावर जिजावंडी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलकाखाली ही पत्रके टाकण्यात आली होती.पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपींचा छडा लावला. शिवा अनिल मिस्त्री (वय ४८, रा. तरूणनगर, ता. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड) व रोहित रंजीत मल्लिक (वय २५, रा. वटेली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माओवाद्यांच्या नावाचा गैरवापर करून भागात दहशत पसरवण्याचा किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *