विधानसभेत आ. संजय पुराम यांची लक्षवेधी; गोंडी भाषेला राज्यभाषेचा दर्जा द्या
साखरीटोला-: भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये गोंडी भाषा समाविष्ट करून गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावे म्हणून आमगाव विधानसभा मतदार क्षेत्राचे गोंड आ. संजय पुराम यांनी (मवीस नियम 105 अन्वये) लक्षवेधी लाऊन सभागृहाचे ध्यान आकर्षित केले. *देशभरात गोंडी भाषा बोलणारे जवळपास तीन कोटी लोक आहेत. तर ज्यांची मातृभाषा गोंडी आहे अशांची संख्या दोन कोटीच्या जवळपास आहे. देशात तेरा राज्यामध्ये गोंडी भाषा बोलल्या जाते. असल्याचे उल्लेख केले. गोंडी भाषेचा एवढा मोठा व्याप असताना गोंडी भाषेकडे सतत दुर्लक्ष होत असून कालांतराने गोंडी भाषा लुप्त होऊ नये यासाठी भारतीय संविधानाच्या अनुसूची आठमध्ये गोंडी भाषा समाविष्ट करुन तिला राज्य भाषेचा दर्जा मिळावा असे उल्लेख केले.* राज्यातील गोंडी भाषिकांच्या वत्तीने आ. पुराम यांनी लक्षवेधले असून पुढील प्रक्रिया संदर्भात शिफारस करण्यात यावे असे म्हटले आहे. गोंडी भाषा ही द्राविडी भाषेतील एक प्रमुख बोली आहे. जी गॉड आदिवासी लोकांची प्राचीन भाषा आहे. समृद्ध पारंपारिक प्रगल्भ असा “इतिहास या भाषेला लाभला असून ही भाषा प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा इत्यादी आणि शेजारील राज्यांमध्ये बोलली जाते. गोंडीमध्ये विविध बोलीभाषा आहेत, जसे की डोरला, कोया, माडिया, मुरिया आणि राज गोडं नांदेड यवतमाळ व लगतच्या तेलंगणा परिसरात प्रामुख्याने कोया बोली प्रचलित आहे. गोंडीसाठी एक स्वतःची लिपी आहे. जी ब्रह्मी लिपीवर आधारित आहे. आणि तिची रचना मुन्शी मंगल सिंग मसारम यांनी केली होती. अतिप्राचीन गोंडवनात गोंडी लिपीने आणि गोंडी भाषेने एक समृद्ध राजभाषा म्हणून सन्मान प्राप्त केला होता. गोंडी भाषा केवळ एक माध्यम नाही, तर ती गोंड लोकांच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गोंडी लोकांमध्ये लोकगीत आणि संगीताला विशेष महत्त्व आहे. काळानुरूप या भाषेचे संवर्धन झाले नाही तरी ही भाषा लुप्त होण्याची भीती असून संवर्धनासाठी लक्षवेधी करण्यात आले.

