गोंदियात मोठी कारवाई: फुलचूरमध्ये साडेचार लाखांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त
अन्न व औषध प्रशासन आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल
गोंदिया : राज्यात विक्री आणि साठवणुकीवर बंदी असलेल्या आणि मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा अवैधरित्या साठा करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. फुलचूर (आमगाव रोड) येथे टाकण्यात आलेल्या धाडीत तब्बल ४ लाख ३८ हजार ७७४ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका आरोपीवर गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा फुलचूर येथे आमगाव रोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ राहणारा संतोष प्रेमचंद जैस्वाल (वय ४५) हा आपल्या ताब्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा बाळगून असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, १९ जून २०२६ रोजी दुपारी २.०० ते रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान या ठिकाणी छापा टाकण्यात आला.
या कारवाईत आरोपी संतोष जैस्वाल याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित (सेंटेड) तंबाखू असा एकूण ४,३८,७७४/- रुपयांचा माल आढळून आला. आरोग्यास घातक व अपायकारक असलेल्या या प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने ही साठवणूक करण्यात आली होती. पथकाने हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे (म.राज्य, गोंदिया) अन्न सुरक्षा अधिकारी चैतन्य जनार्दन नानोटे (वय २८) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी संतोष जैस्वाल याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम १२३, २१४, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), २७(३)(e), ३०(२)(a), ३१(z)(v) अन्वये गुन्हा (गुन्हा क्र. ३७४/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सिंगणजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) येरमे हे करीत आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


