अमरावतीत थरार: डोळ्यात तिखट फेकून युवकाची निर्घृण हत्या!
जुन्या वैमनस्यातून प्रकार; एका अल्पवयीनासह तिघांना बडनेरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमरावती : येथील बडनेरा परिसरात जुन्या वादातून एका २२ वर्षीय युवकाची डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओम आशिष कैथवास (वय २२, रा. माताफैल, जुनी वस्ती, बडनेरा) असे मृत युवकाचे नाव आहे. या थरारक हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, बडनेरा पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना अटक केली आहे. रोशन कैथवास (वय १९, रा. बडनेरा), संकेत कैथवास (वय २०, रा. बडनेरा) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लग्नातील डान्सवरून झाला होता वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मृत ओम आणि आरोपी रोशन यांच्यात सुमारे एक वर्षापूर्वी एका लग्न समारंभात नाचण्यावरून वाद झाला होता. या वादाची कुरापत काढून आरोपींकडून ओमला सतत धमकावले जात होते, तसेच रस्त्यात अडवून मानसिक त्रास दिला जात होता. याच जुन्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी तिन्ही आरोपींनी ओमच्या हत्येचा कट रचला.
भररस्त्यात थरार; दहशत पसरवत आरोपी फरार
शनिवारी (२० जून) रात्री १०:३० वाजताच्या सुमारास ओम आपल्या दुचाकीने घरी परतत असताना, बडनेरा येथील भगतसिंग चौक परिसरातील एका देशी दारू दुकानाच्या समोर आरोपींनी त्याला गाठले. आरोपींनी आधी ओमच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यानंतर तो काही समजण्याच्या आत त्याच्या पोटात, छातीत, गळ्यात आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. घटनेनंतर आरोपी हातात रक्ताळलेले शस्त्र हवेत फिरवून दहशत पसरवत पसार झाले. या भीतीमुळे परिसरातील दुकानदारांनी तात्काळ आपल्या दुकानाचे शटर बंद केले.
……………………..
उपचारापूर्वीच मृत्यू, पोलिसांची जलद कारवाई
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओमला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवून काही तासांतच तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मृत ओमची आई प्रमिला कैथवास यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


