LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

पोलिओ निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; ९४ हजार बालकांना पाजणार ‘दोन थेंब’!

येत्या रविवारी विशेष मोहीम; १४३५ बूथवर ३१८३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
 एकही बालक वंचित राहणार नाही याची घेणार काळजी.
गोंदिया :
देशाला संपूर्ण पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने येत्या रविवारी (दि. २८) विशेष पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील पाच वर्षांखालील तब्बल ९४ हजार ८९ बालकांना ‘दो बूँद जिंदगी के’ म्हणजेच पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. या मोहिमेत एकही बालक डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने चोख नियोजन केले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
१,४३५ बूथ आणि ३,१८३ कर्मचारी तैनात जिल्ह्यात रविवारी आयोजित या विशेष मोहिमेसाठी एकूण १ हजार ४३५ पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत. पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील चिमुरड्यांना जवळच्या बूथवर नेऊन डोस पाजण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ३ हजार १८३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी २९० पर्यवेक्षक (Supervisors) तैनात राहतील.
……………………
जिल्ह्यातील सद्यस्थिती एका नजरेत:
डोस द्यावयाची एकूण बालके: ९४,०८९
एकूण पोलिओ बूथ: १,४३५
एकूण कर्मचारी: ३,१८३
एकूण पर्यवेक्षक: २९०
………………………..
रविवारी सुटलेल्या बालकांसाठी गृहभेट मोहीम; कर्मचारी जाणार घरोघरी!
विशेष मोहिमेच्या दिवशी काही बालके बूथवर येऊ शकली नाहीत, तर त्यांच्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. रविवारच्या मुख्य मोहिमेनंतर ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आणि शहरी भागात पुढील पाच दिवस आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणादरम्यान सुटलेल्या प्रत्येक बालकाला शोधून त्याला पोलिओचा डोस पाजला जाईल.
……………………
नागरिकांना आवाहन… “रविवारी विशेष पोलिओ लसीकरण मोहीम असून, जिल्ह्यातील ९४ हजार ८९ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी न विसरता आपल्या बालकांना जवळील लसीकरण केंद्रात नेऊन डोस पाजावा.”

  • डॉ. अभिजित गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी
Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *