रुग्णालय की मृत्यूचा सापळा? गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयात अवघ्या तीन दिवसांत ३ बाळंतिणींचा बळी
आरोग्य यंत्रणेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप!
Gondia Maharashtra vidarbha Gondia Maharashtra vidarbha bhandara Gadchiroli chandrapur
गोरगरीब जनतेसाठी संजीवनी समजल्या जाणाऱ्या शासकीय रुग्णालयांचा कारभार किती निर्दयी आणि निष्काळजी झाला आहे, याचा संतापजनक आणि सुन्न करणारा प्रकार गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात समोर आला आहे. मातामृत्यू शून्यावर आणण्याच्या सरकारी गप्पा मारणाऱ्या आरोग्य विभागाचे वस्त्रहरण करत या रुग्णालयात अवघ्या तीन दिवसांत सलग तीन निष्पाप बाळंतिणींचा तडफडून मृत्यू झाला. २० ते २२ सप्टेंबरदरम्यान घडलेल्या या धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरून गेला असून, जनमानसातून आरोग्य यंत्रणेच्या नाकर्तेपणाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे.नवेगावबांध येथील कोमल सतीश गजबे (वय २४) यांना १९ सप्टेंबर रोजी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. २० सप्टेंबर रोजी त्यांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली खरी, पण त्यानंतर त्यांना लघवीचा त्रास सुरू झाला आणि दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणे बंद केले; अखेर उपचारादरम्यान २२ सप्टेंबरच्या रात्री अतिदक्षता विभागात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तिरोडा तालुक्यातील काचेवानी येथील नाजुक रिवाज शाह (वय २५) यांना ९ सप्टेंबर रोजी दाखल करून त्यांची प्रसूती झाली, मात्र प्रकृती खालावल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आणि उपचारादरम्यान २१ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचाही मृत्यू ओढवला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. तर २० सप्टेंबर रोजी गोंडीटोला (धिवारी) येथील पूजा राकेश फरकंडे (वय २४) या बाळंतिणीचाही अशाच प्रकारे बळी गेला.कागदोपत्री योजनांचा ढोल वाजवणाऱ्या प्रशासनाला या मातांचे जीव वाचवता का आले नाहीत? प्रसूतीनंतरची आवश्यक काळजी आणि देखरेख करण्यात रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी अपयशी का ठरले? असे अनेक संतप्त सवाल आता उपस्थित केले जात आहेत. आपल्या आप्तांचा नाहक बळी गेल्याने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर तीव्र संताप व्यक्त केला असून, कागदावरच्या आकडेवारीपलीकडे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या विभागाचा ‘रिॲलिटी चेक’ करावा, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. या निष्पाप मातांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दोषींवर तात्काळ कठोर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे चौकशीचे नाटक करून प्रकरण दडपले जाणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

