LatestNewsगोंदियागोंदिया- भंडारा

Dr Pankaj bhoyar : शालेय शिक्षणाच्या माध्यमातूनच देशाची भावी पिढी निर्माण होईल : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास शासन प्रयत्नशीलशिक्षक – शिक्षण अधिसंमेलन कार्यक्रम

गोंदिया : शालेय शिक्षण हा विद्यार्थ्यांचा महत्वाचा पाया आहे. यातूनच देशाची भावी पिढी निर्माण होत असते. शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवितात, त्यामुळे शिक्षक हे गुरुस्थानी आहेत. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून विद्यार्थ्यांना घडवावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर ( Dr Pankaj bhoyar ) यांनी आज शिक्षक – शिक्षण अधिसंमेलनात केले.येथील लक्की लॉन, फुलचूर नाका येथे आयोजित शिक्षक – शिक्षण अधिसंमेलन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सर्वश्री आमदार विनोद अग्रवाल, राजकुमार बडोले, जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.संघटनेचे कौतुक करत डॉ. भोयर ( Dr Pankaj bhoyar ) म्हणाले, शिक्षण क्षेत्राला वाहिलेली नियोजनबध्द संघटना कशी असावी, हे शिक्षक सहकार संघटनेनी दाखवून दिले आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास आपण शासनस्तरावर प्रयत्नशील आहोत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी एकनिष्ठपणे कर्तव्य बजवावे. शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्यात आलेली आहे. यासंदर्भात शिक्षक संघटनांच्या भावना लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे राज्याच्या शिक्षकांच्या पाठीशी असून योग्य ते निर्णय घेतील असेही ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दूरदृष्ष्टीतून पीएमश्री शाळांच्या धर्तीवर राज्यात सीएमश्री शाळा लागु करण्यात आलेली असल्याची माहिती देत डॉ. भोयर यांनी सांगितले, राज्यात 1 लाख 7 हजार शाळा आहेत. यामध्ये 65 हजार शाळा शासकीय आहेत. गोंदिया जिल्ह्यात 21 पीएमश्री शाळा या उपक्रमांतर्गत समावेश करण्यात आले आहेत. पीएमश्री योजनेतून गुणवत्तेमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या योजनेतून शाळेमध्ये भौतिक सुविधा मिळत असून ग्रामीण भागातील शाळांचे चित्र आता बदलत आहे. सीएमश्री योजनेचा लाभ घेतलेल्या आदर्श शाळाही येत्या काळात जिल्ह्यात दिसतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांकडून व्यक्त केली. शालेय शिक्षणांतर्गत होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनांची माहिती देतांना श्री. भोयर ( Dr Pankaj bhoyar ) म्हणाले की, राज्य शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होत आहे. राज्यात आदर्श शाळा योजना सुरु करण्यात आली असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. शिक्षकांनी ज्ञान, सेवा आणि समर्पण या त्रिसुत्रीचा वापर करावा. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा पुर्नोच्चार त्यांनी यावेळी केला. यावेळी शिक्षण सेवा संघटनेचे राज्यस्तरीय अध्यक्ष संतोष पित्तलवार, रविंद्र अंबुले आणि जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम यांनी शिक्षकांच्या वतीने मागण्या मांडल्या.यावेळी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विशाल डोंगरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी यांचेसह सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *