LatestNewsगोंदिया- भंडारा

वाकलमध्ये मध्यरात्री थरार! उकाड्यामुळे पोर्चमध्ये झोपलेल्या महिलेवर अस्वलाचा जीवघेणा हल्ला

महिला गंभीर जखमी; नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यूशी झुंज
वाकल परिसरात सलग दुसऱ्या वर्षी अस्वलाचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये घबराट
वनविभागाकडून पिंजरा लावण्याची तयारी; १.५ लाखांची तातडीची मदत जाहीर
पालांदूर (भंडारा ):
लाखनी तालुक्यातील वाकल गावात गुरुवारी मध्यरात्री एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. कडक उकाड्यामुळे घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या एका ४३ वर्षीय महिलेवर जंगलातून आलेल्या हिंस्त्र अस्वलाने अचानक जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वाकल आणि पालांदूर परिसरात अस्वलाची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
थेट डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार!
अनिता अंबादास बनकर (वय ४३, रा. वाकल) असे जखमी महिलेचे नाव आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपून उकाडा जास्त असल्याने त्या घराबाहेरील पोर्चमध्ये झोपल्या होत्या. रात्री १२:२० वाजताच्या सुमारास जंगलाच्या दिशेने आलेल्या अस्वलाने झोपलेल्या अनिता यांच्यावर थेट हल्ला केला. अस्वलाने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर पंज्यांचे गंभीर वार केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यांनी केलेल्या ओरडण्यामुळे कुटुंबीय आणि शेजारी धावून आले. नागरिकांची गर्दी पाहताच अस्वल पुन्हा जंगलाच्या दिशेने पसार झाले.
वाकल ते नागपूर… उपचारासाठी धावपळ! घटनेनंतर माजी सरपंच टीकाराम तरारे व गावकऱ्यांनी जखमी अनिता यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलवण्यात आले, मात्र जखमा अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.
मध्यरात्रीच वनविभाग घटनास्थळी; पिंजरे लावणार
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे बीटरक्षक एन. एम. कळंबे यांनी सहकाऱ्यांसह रात्रीच वाकल गाठून शोधमोहीम राबवली, परंतु अस्वलाचा सुगावा लागला नाही. शुक्रवार सकाळी सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वैनगंगा आणि वन परिसराला लागून असलेल्या वाकल गावात सलग दुसऱ्या वर्षी अस्वलाचा हल्ला झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वनविभागाने आता अस्वलाचा वावर असलेल्या भागात पिंजरे लावण्याची तयारी सुरू केली आहे.
शासनाकडून दीड लाखांची तातडीची मदत
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिलेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जाणार असून, प्राथमिक टप्प्यात १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश थेट रुग्णालयात सुपूर्द करण्यात येणार आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *