कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषदेत पहाटे ‘अग्नितांडव’; नगराध्यक्षांचे केबिन जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान!
संगणक, महत्त्वाचे दस्तावेज व फर्निचर भस्मसात; घातपाताची शंका? आगीच्या कारणावरून शहरात तर्क-वितर्कांना उधाण!
कळमेश्वर (नागपूर) : येथील कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषदेच्या कार्यालयाला बुधवारी (१७ जून) पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत नगराध्यक्षांचे संपूर्ण केबिन, त्या शेजारील महत्त्वाचे प्रशासकीय विभाग, अनेक संगणक, महागडे फर्निचर आणि विविध विभागांतील अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत असले, तरी या घटनेमुळे संपूर्ण शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे.
पहाटे ५ वाजता उघडकीस आला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास रात्रपाळीवर कार्यरत असलेले कर्मचारी गुंडेराव कुमरे यांना नगरपरिषद कार्यालयातून धूर आणि आगीच्या प्रचंड ज्वाला निघताना दिसल्या. त्यांनी तातडीने कळमेश्वर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र आगीची भीषणता एवढी मोठी होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने वाडी, सावनेर आणि मोहपा नगरपरिषद येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागले. चारही ठिकाणच्या जवानांनी जवळपास दोन तास शर्थीचे प्रयत्न करून सकाळी ७ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.
‘या’ विभागांचे झाले अतोनात नुकसान!
आग आटोक्यात आली असली तरी, तोपर्यंत नगरपरिषदेचे मोठे नुकसान झाले होते. नगराध्यक्षांच्या मुख्य केबिनसह त्याला लागून असलेले आस्थापना विभाग, आरोग्य विभाग आणि आवक-जावक विभाग या कार्यालयांतील सर्व संगणक, सरकारी कागदपत्रे आणि फर्निचर पूर्णपणे जळाले. कार्यालयातील लोखंडी कपाटे, पंखे व इतर साहित्य आगीत भस्मसात झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने बांधकाम विभाग, मालमत्ता कर विभाग, अकाउंट विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग आणि पाणीपुरवठा विभाग या भागांपर्यंत आग पोहोचली नाही, त्यामुळे येथील कागदपत्रे सुरक्षित आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; १८ जूनपासून नगर भवनातून कामकाज
घटनेची माहिती मिळताच सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नगरपरिषद कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांनी सुरक्षित राहिलेल्या कागदपत्रांची खातरजमा केली. नगरपरिषदेचे कामकाज विस्कळीत होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून १८ जूनपासून नगर भवन येथून नियमित कामकाज सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी कळमेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आगीमागे नेमकं कारण काय? उच्चस्तरीय चौकशीची मागणी
प्राथमिकदृष्ट्या आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात असले, तरी आमदार आशिष देशमुख व भाजप नेते डॉ. राजीव पोतदार यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आग लागल्यानंतर तातडीने विझवण्याचे प्रयत्न झाले की नाही? अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे कार्यरत होती का? आग विझवण्यास विलंब का झाला? आणि यामागे प्रशासनातील कोणी जबाबदार आहे का? या सर्व बाजूंची चौकशी करण्याची मागणी नेत्यांनी लावून धरली आहे. नगराध्यक्ष अविनाश माकोडे, उपाध्यक्ष धनराज देवके, वीज वितरण कंपनीचे अभियंते आणि नगरसेवकांनीही घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली.

