LatestNewsगोंदियाविदर्भ

आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांकडून व्हावे : उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत

गोंदिया नगरपरिषद क्षेत्रात 1 लाख 24 हजार 311 मतदार बजावणार मतदानाचा हक्क 

गोंदिया  : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्यात 4 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिषद व नगरपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागु झाली असून आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांकडून व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी आज नगरपरिषद गोंदिया येथील सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी संदिप बोरकर उपस्थित होते.श्री. खंडाईत म्हणाले, गोंदिया नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी राहणार आहेत, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद गोंदिया मुख्याधिकारी व अपर तहसिलदार गोंदिया हे राहतील. गोंदिया नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत 1 लाख 24 हजार 311 मतदार आहेत. यामध्ये पुरुष- 59 हजार 687, महिला- 64 हजार 616, इतर- 8 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये मतदान केंद्र 128 आहेत, तर निवडणूक प्रभागांची संख्या 22 आहे. यासाठी 13 झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूकी दरम्यान गोंदिया नगरपरिषद क्षेत्रात कुठेही आदर्श आचारसंहितेचे भंग होणार नाही यासाठी स्थीर तपासणी पथक (SST), फ्लाईंग स्पॉट टिम (FST) व व्हिडिओ सर्व्हिलन्स टिम (VST) पथक कार्यरत राहणार आहे असे त्यांनी सांगितले.श्री. खंडाईत पुढे म्हणाले, निवडणूक मतदान 2 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, गोंदिया येथे होणार आहे. अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील www.gondia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. बुथनिहाय यादी 8 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. वृध्द व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर व्हील चेअर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. निवडणुकीचा प्रचार सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत करता येईल. प्रचाराचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नगरपरिषद गोंदिया क्षेत्रातील नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *