तुमसरमधील भरदिवसा झालेली घरफोडी उघडकीस; आरोपी जेरबंद, सोन्याची लगड जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची तत्परता : अवघ्या काही दिवसांत भंडारा पोलिसांना यश
भंडारा : तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगर येथे भरदिवसा झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा भंडारा पोलिसांनी अत्यंत अल्प कालावधीत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्थानिक मालवीय वॉर्डातून एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या सोन्यापासून तयार केलेली चपटी गोलाकार लगड जप्त करण्यात आली आहे.
श्रीराम नगर येथील रहिवासी चंद्रशेखर श्रीराम सार्वे (४२) हे २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून कामावर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉकर फोडून आत ठेवलेले ५ ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे मंगळसूत्र आणि ३० हजार रुपये रोख, असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. सार्वे संध्याकाळी साडेपाच वाजता घरी परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तुमसर पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धाड गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ एका विशेष तपास पथकाची स्थापना केली. तपासादरम्यान पोलीस पथकाला गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुमसर येथील मालवीय वॉर्डात छापा टाकून संशयित प्रदीप प्रेमलाल गौरे (४७) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या प्रदीपची जेव्हा पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने चोरीची कबुली दिली.
दागिने वितळवले, पण सुटका नाही! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र ओळखता येऊ नये म्हणून ते वितळवले होते. त्या सोन्यापासून त्याने ४.८० ग्रॅम वजनाची चपटी गोलाकार सोन्याची लगड तयार केली होती. पोलिसांनी आरोपीकडून ही लगड जप्त केली असून, तिची बाजारपेठीय किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे.
यांनी केली कारवाई ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तुमसरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम, पोलीस हवालदार शरद रामटेके, पोलीस अंमलदार बलदे, राजकुमार गिरीपुंजे, नितीन झंझाड, विजय दमाहे आणि अजय बावने यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

