पाईपमध्ये लपलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका
साकोली वनविभागाची यशस्वी कामगिरी; आरोग्य तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्तता
साकोली (भंडारा) : साकोली वनपरिक्षेत्रातील सावरबंध बिट अंतर्गत येणाऱ्या वळद येथे एका पाण्याच्या पाईपमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, साकोली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र सावरबंधमधील वळद येथे भोजराम भिवा बनकर यांच्या शेताजवळ दुर्गाबाई डोह कालव्याच्या खालील पाण्याच्या पाईपमध्ये एक बिबट्या लपून बसल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती वळदच्या सरपंच माधवी बडवाईक यांनी सावरबंध बिटाच्या वनरक्षक अंबुले यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी आपल्या अधीनस्थ वनरक्षक व वनकर्मचाऱ्यांच्या पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सदर घटनास्थळ मानवी वस्तीच्या अगदी जवळ असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनविभागाने परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याच्या सूचना दिल्या. यानंतर साकोलीच्या वन्यप्राणी बचाव दलाला (शीघ्र कृती दल) पाचारण करण्यात आले.
बचाव पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पाईपच्या एका बाजूला पिंजरा लावला. अत्यंत कौशल्याने व संयमाने नियोजन करत बिबट्याला कोणतीही इजा न होऊ देता सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
जेरबंद केल्यानंतर एनएनटीआरचे पशुधन विकास अधिकारी मेघराज तुलावी यांनी या नर बिबट्याची आरोग्य तपासणी केली. हा बिबट्या पूर्णपणे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
वनविभागाचे नागरिकांना आवाहन
मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे. वन्यजीव मानवी वस्तीत किंवा परिसरात आढळल्यास त्यांची शिकार करण्याचा किंवा त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. अशा परिस्थितीत तत्काळ जवळच्या वनकर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा वनविभागाच्या ‘हॅलो फॉरेस्ट’ हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन साकोली वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

