गोंदिया जिल्ह्यातील ८२ हजार बालकांना मिळणार ‘स्टॉप डायरिया’चे सुरक्षा कवच!
‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अंतर्गत १६ जूनपासून विशेष मोहीम; १,२९२ आशा सेविका उतरणार मैदानात
जिल्ह्यातील ६६ हजार कुटुंबांचे होणार सर्वेक्षण; अंगणवाड्या आणि शाळांवरही विशेष लक्ष
गोंदिया: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बालकांमधील अतिसाराचे प्रमाण रोखण्यासाठी आणि बालमृत्यू दरात घट करण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत विशेष ‘स्टॉप डायरिया’ (Intensified Diarrhea Control Fortnight) मोहीम राबविण्यात येत आहे. आगामी १६ जून ते ३१ जुलै २०२६ या दीड महिन्यांच्या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार असून, या माध्यमातून जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील तब्बल ८२,८२४ बालकांना ओआरएस आणि झिंकच्या गोळ्यांचे सुरक्षा कवच मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली आहे.पावसाळ्यात दूषित पाणी आणि इतर कारणांमुळे लहान मुलांमध्ये डायरियाचा (अतिसार) धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यावर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये सध्या ९१,८५८ ओआरएस पाकिटे, १,६०,८०० झिंकच्या गोळ्या आणि ३,८८७ झिंक सिरपचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.१,२९२ आशा सेविकांवर मोठी जबाबदारीया मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी गावपातळीवर करण्यासाठी १ हजार २९२ आशा स्वयंसेविका मैदानात उतरणार आहेत. आशा सेविका जिल्ह्यातील ६६,४३८ कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करतील. तसेच, आजारापासून बचावासाठी कुटुंबातील सदस्यांना प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करणार आहेत.शाळा आणि अंगणवाड्यांचे होणार सर्वेक्षणकेवळ घरोघरीच नव्हे, तर जिल्ह्यातील १,८७८ अंगणवाड्या आणि १,१६५ जिल्हा परिषद शाळांमधील बालकांचेही सविस्तर सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. साधारण १३ लाख २९ हजार ०५३ एवढ्या लोकसंख्येच्या कार्यक्षेत्रात ही आरोग्य यंत्रणा सक्रिय राहणार आहे.पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहनसहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी (DRCHO) डॉ. रोशन राऊत यांनी जिल्ह्यातील नागरिकांना, विशेषतः पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “पावसाळ्यात मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आशा सेविका घरी आल्यास त्यांना बालकांच्या आरोग्याविषयी योग्य माहिती देऊन सहकार्य करावे आणि आपल्या ५ वर्षांखालील बालकांना या मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
📊 मोहिमेची ‘अक्शन प्लॅन’ एका नजरेत:लक्ष्यित बालके: ८२,८२४ (० ते ५ वर्षे)भेट दिली जाणारी कुटुंबे: ६६,४३८अंगणवाड्यांचे लक्ष्य: १,८७८जि. प. शाळांचे लक्ष्य: १,१६५उपलब्ध ओआरएस पाकिटे: ९१,८५८झिंक गोळ्यांचा साठा: १,६०,८००

