कालव्यात आढळला २३ वर्षीय युवकाचा मृतदेह; घातपाताचा संशय
वडिलांचा खुनाचा आरोप, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात खळबळ
अर्जुनी-मोर (प्रतिनिधी): अर्जुनी-मोर तालुक्यातील बोंडगावदेवी येथील २३ वर्षीय युवकाचा मृतदेह ईटियाडोह धरणाच्या कालव्यात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आशिष जितेंद्र मेश्राम (वय २३, रा. बोंडगावदेवी) असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणात घातपात झाल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धुलीवंदनाच्या दिवशी आशिष मेश्राम हा आपल्या मित्रांसोबत गावात मौजमजा करताना दिसून आला होता.
मंगळवार, ३ मार्चच्या सायंकाळपर्यंत तो गावातच होता, मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईकांकडेही चौकशी करून पाहिली, तरीही त्याचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान, ५ मार्च रोजी आशिष बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील जितेंद्र मेश्राम यांनी अर्जुनी-मोर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्याच दिवशी गोठणगाव-प्रतापगडकडून येणाऱ्या ईटियाडोह कालव्यातून एक मृतदेह वाहत येत असल्याची माहिती केशोरी पोलीस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार मंगेश काळे आपल्या पथकासह चिचोली येथील तिबेटियन कॅम्प परिसरात दाखल झाले आणि कालव्यात अडकलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या हातावर ‘आशिष’ असे नाव लिहिलेले असल्याने तसेच अर्जुनी-मोर पोलीस ठाण्यात त्याच दिवशी नोंद झालेल्या तक्रारीशी वर्ण जुळत असल्याने हा मृतदेह आशिष मेश्राम याचाच असल्याची खात्री पटली. कुटुंबीयांनी ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी-मोर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दुसऱ्या दिवशी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले, मात्र यावेळी मृतकाचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आशिषचा खून झाल्याचा संशय व्यक्त करत संशयित आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी अर्जुनी-मोरचे ठाणेदार कमलेश सोनटक्के व केशोरीचे ठाणेदार मंगेश काळे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास केशोरी व अर्जुनी-मोर पोलीस करीत आहेत.

