LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

‘शिक्षणमंत्री राजीनामा द्या’; आकांक्षा चतुर्वेदी आत्महत्या व बेरोजगारीच्या मुद्द्यावर नागपुरात सीजेपीचे भव्य आंदोलन!

संविधान चौकात हजारो विद्यार्थी आणि तरुणांचा एल्गार;
हातात संविधानाची प्रत अन् गुलाब घेऊन निदर्शने
शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर कडाडून टीका
‘जय श्रीराम’च्या घोषणाबाजीमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणाव
नागपूर :
NEET परीक्षेतील पेपर लीक, सीबीएसई परीक्षांमधील गोंधळ, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि देशातील कोलमडलेली शिक्षण व्यवस्था याच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी संविधान चौकात कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठ नागरिक हातात संविधानाची प्रत, गुलाब आणि मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले होते. यावेळी नागपूरची विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदी हिच्या आत्महत्येचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करत आंदोलकांनी प्रशासकीय व्यवस्थेला धारेवर धरले.
…तर मी अराजकतावादी आहे : अभिजित दीपके
आंदोलनाला संबोधित करताना सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सरकारवर तीक्ष्ण बाण चालवले. “पेपर लीकच्या घटना देशातील खिळखिळ्या सिस्टीमचे प्रतीक आहेत. विद्यार्थिनी आकांक्षाच्या आत्महत्येमागेही हीच लचर व्यवस्था कारणीभूत आहे,” असा आरोप त्यांनी केला. सरकार पैशांच्या जोरावर आमदार खरेदी करण्यात व्यस्त आहे; तोच पैसा पीडित कुटुंबांना मदत म्हणून दिला असता, तर त्यांचा आर्थिक भार कमी झाला असता, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी सीजेपीला ‘अराजकतावादी’ म्हटल्याचा समाचार घेताना ते म्हणाले, “जर गांधीवादी आणि आंबेडकरवादी मार्गाने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणे अराजकता असेल, तर होय, आम्ही अराजकतावादी आहोत.” तरुणांनी धार्मिक राजकारणापासून दूर राहून शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारच्या कार्यपद्धतीत बदल हवा : नितेश कराले
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते नितेश कराले यांनी शहीद भगतसिंग यांच्या विचारांची आठवण करून देत, तरुणांच्या हिताचे रक्षण न करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे ठणकावून सांगितले. त्यांनी इथेनॉल पेट्रोलच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर खोचक टीका केली. या आंदोलनात एआयएएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष विराज देवांग, प्रदेशाध्यक्ष वैभव चोपकर, जनबदलाव पार्टीचे यश गौरखेडे, दुर्गेश कुढिके, अनिकेत मेश्राम यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
घोषणाबाजीमुळे तणाव, पोलिसांचा हस्तक्षेप
आंदोलनादरम्यान आंदोलकांनी प्रतीकात्मक कॉकरोचचे मास्क परिधान केले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब झिंदाबाद’ आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलन शांततेत सुरू असतानाच, ‘भारत माता संघटना’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी येत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे आंदोलक आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला आणि काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आणि परिस्थिती नियंत्रणात राहिली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *