सिंदीबिरी जंगल शिवारात वाघाची दहशत; मध्यरात्रीच्या डरकाळीने उडाली गावकऱ्यांची झोप
वनविभागाकडून गस्त वाढवली; पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी
देवरी (गोंदिया ) : तालुक्यातील सिंदीबिरी जंगल शिवारात शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास वाघाची जोरदार डरकाळी ऐकू आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाघाचा आवाज इतका स्पष्ट आणि जवळून येत होता की, आजूबाजूच्या वस्त्यांमधील नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला. या घटनेमुळे संपूर्ण सिंदीबिरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गावकऱ्यांची झोप उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १२ जून रोजी रात्री साडेअकराच्या (११:३०) सुमारास सिंदीबिरी जंगल शिवारातून वाघाची अत्यंत मोठी डरकाळी ऐकू आली. रात्रीच्या नीरव शांततेत हा आवाज घुमल्याने परिसरातील नागरिक हादरून जागे झाले. वाघ वस्तीच्या अगदी जवळ आल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी वनविभागाला तातडीने पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने या भागात रात्रीची गस्त वाढवली आहे. तसेच, ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी जंगलाच्या दिशेने जाऊ नये आणि शेतात एकटे जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. वाघाचा वावर नक्की कोणत्या भागात आहे, याचा शोध सध्या वनविभागाचे पथक घेत आहे.
………………..
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
सिंदीबिरी हे गाव जंगलाला लागूनच आहे. येथील अनेक नागरिक शेती आणि मजुरीच्या कामासाठी पहाटेच घराबाहेर पडतात. मात्र, वाघाचा आवाज ऐकल्याने आता जीव मुठीत धरून शेतात जावे कसे, असा मोठा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. मजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या रोजगारावरही या दहशतीमुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.
……………..
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
सिंदीबिरी आणि आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा. वाघाच्या हालचालींवर अचूक लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात यावेत. वनविभागाने तातडीने सर्च मोहीम राबवून वाघाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने यावर त्वरित ठोस पावले उचलावीत, अशी तीव्र अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

