चंद्रपूर आरटीओ कार्यालयात दलालांची गुंडगिरी; हक्काचे पैसे मागत असलेल्या तरुणीवर भरदिवसा उगाराला चाकू!
भरचौकात तरुणीला अश्लील शिवीगाळ; पोलिसांसमोर दलालांचे आव्हान, रामनगर पोलीस ठाण्यात दोन नराधमांवर गुन्हा दाखल
चंद्रपूर (१० जून) : शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) दलालांचा आणि गुंडांचा अड्डा बनले आहे की काय, असा संतप्त सवाल निर्माण करणारी एक खळबळजनक घटना आज समोर आली आहे. आरटीओ कार्यालय परिसरात आपल्या हक्काचे पैसे परत मागणाऱ्या एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला पैशांऐवजी थेट मृत्यूची धमकी देण्यात आली. इतकेच नव्हे तर भरदिवसा, शेकडो लोकांच्या उपस्थितीत एका सराईत गुंडाने तरुणीवर चाकू उगारून ‘तुला जीवानिशी मारीन’ अशी धमकी दिली. या धक्कादायक प्रकारामुळे आरटीओ परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रामनगर पोलिसांनी या प्रकरणी दोन दलालांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी संजय चिवडे (रा. इंदिरानगर, चंद्रपूर) आणि आशिष उराडे (रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डातील रहिवासी आणि पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने वर्षभरापूर्वी तिच्या मामाच्या नावावर असलेली गाडी वडिलांच्या नावावर करण्यासाठी संजय चिवडे नावाच्या दलालाला २० हजार रुपये दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही संजयने तिचे काम केले नाही आणि तिचे पैसेही हडप केले. बुधवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास ही तरुणी आरटीओ कार्यालयात काही कागदपत्रांच्या कामासाठी गेली असता, तिला तिथे संजय चिवडे दिसला. तिने हिंमत दाखवून त्याला अडवले आणि आपले हक्काचे पैसे परत मागितले. पैशांची मागणी करताच संजयचा तिळपापड झाला आणि त्याने भररस्त्यात तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली.
…………………………..
उसाच्या रसाच्या गाडीवरील चाकू उगारून दिली जीवे मारण्याची धमकी!
हा वाद सुरू असतानाच, तिथे उपस्थित असलेला संजयचा साथीदार आशिष उराडे (रा. अष्टभुजा वॉर्ड) याने विनाकारण मध्ये पडून विद्यार्थिनीला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही, तर त्याने आरटीओ परिसरातील एका उसाच्या रसाच्या गाड्यावर ठेवलेला धारदार चाकू उचलला आणि भरचौकात तरुणीच्या अंगावर धावून गेला. “तुला चाकूने जीवानिशी मारीन!” अशी धमकी त्याने दिली. या गुंडगिरीमुळे आरटीओ परिसरात काही काळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती. आरोपींनी उघडपणे चाकू काढल्याने आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिथे जमलेल्या मोठ्या गर्दी पैकी एकानेही तरुणीला वाचवण्याचा किंवा दलालांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर पीडित तरुणीने स्वतः रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
……………………………………..
आरोपी आशिष उराडे हा ‘आरटीओ’मधील सराईत गुन्हेगार!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकू उगारणारा आरोपी आशिष उराडे हा साधासुधा दलाल नसून आरटीओ कार्यालयातील एक सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी एका मृत व्यक्तीच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून आरटीओमध्ये मोठी फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कलम ४२० अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल आहे. असे फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार आरटीओ परिसरात मोकाट फिरतातच कसे, हा मोठा प्रश्न आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
……………………………………….
आरटीओ ऑनलाईन की दलालांच्या दारात गहाण?
चंद्रपूर आरटीओचे अधिकारी श्याम लोही सांगतात की, आरटीओ कार्यालयात पारदर्शक काम चालते आणि १०५ सेवा ऑनलाईन व फेसलेस झाल्या आहेत. मग ‘देशोन्नती’चा प्रश्न आहे की, जर सगळ्या सेवा ऑनलाईन आहेत, तर आरटीओ कार्यालयाच्या आवारात संजय चिवडे आणि आशिष उराडे सारखे ४२० आणि चाकू घेऊन फिरणारे दलाल रोज काय करतात? सर्वसामान्यांना ऑनलाईन कामात अडचणी आणून त्यांना दलालांच्या दारात जाण्यास भाग पाडणारी यंत्रणा आरटीओमध्ये सक्रिय आहे, हेच या घटनेवरून सिद्ध होते. परिवहन विभागाने आणि पोलिसांनी या दलालांच्या अड्ड्यांवर तातडीने बुलडोझर चालवावा, अन्यथा चंद्रपूरकर आरटीओ कार्यालयाला कुलूप ठोकतील!

