गोंदियाच्या अमितकडून भंडार्यात जीम ट्रेनरवर जीवघेणा हल्ला!
प्रेम प्रकरणातून संशय; दसरा मैदानावर बोलावून चाकूने केले वार
भंडारा : प्रेम प्रकरणातून संशय घेत प्रेयसीचा मित्र असलेल्या एका जीम ट्रेनरवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरातील गजबजलेल्या शास्त्री नगर येथील दसरा मैदानावर घडली. ९ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जिम ट्रेनर अभिषेक लक्ष्मीनिवास तिवारी हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गोंदिया येथील अमित प्रेमलाल पटले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा येथील २३ वर्षीय तरुणीची गोंदिया येथील अमित पटले याच्यासोबत फेसबुकवर ओळख झाली होती. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, अमितला दारूचे व्यसन असल्याने तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या अमितने तरुणीच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर काही काळ दोघांमधील बोलचाल पूर्णपणे बंद झाली होती. याच दरम्यान संबंधित तरुणीने भंडार्यातील एका जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. तिथे तिची ओळख जीम ट्रेनर अभिषेक तिवारी यांच्यासोबत झाली.
अमित पटले हा भंडार्यात आला असता, त्याला अभिषेक व तरुणीच्या मैत्रीबद्दल कळाले. त्याने दोघांच्या संबंधांवर संशय घेण्यास सुरुवात केली. या कारणावरून त्याने आधी एका कॅफेमध्ये भेटण्यासाठी तरुणीला बोलावले होते. त्यानंतर ९ जूनच्या रात्री आठ वाजता अमितने अभिषेक तिवारी, संबंधित तरुणी आणि तिच्या एका मैत्रिणीला दसरा मैदानात चर्चेसाठी बोलावले. तिथे चर्चा सुरू असतानाच अमितने अभिषेक व तरुणीच्या संबंधांवरून वाद घालत भांडण उकरून काढले. हा वाद इतका विकोपाला गेला की अमितने अभिषेक तिवारी याला अश्लील शिवीगाळ करत थेट चाकूने त्याच्या गळ्यावर वार केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अमित पटले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम २९६, ३५१, ३५२, १९१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भंडार्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक खांदाडे करीत आहेत.

