गोंदिया शहर पोलिसांची मोठी कारवाई; २ किलो गांजासह दोन तस्करांना अटक, ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया (प्रतिनिधी): अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४४ हजार रुपये किमतीचा २ किलो २०० ग्रॅम गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकूण ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मढी चौक परिसरात करण्यात आली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी गोंदिया शहर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, एका काळ्या रंगाच्या मोपेडवरून दोन इसम अवैध गांजा घेऊन भीमनगरमार्गे मढी चौकाकडे येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मढी चौक परिसरात नाकाबंदी केली. काही वेळातच संशयास्पद मोपेड येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवले. मोपेडवरील इसमांची नावे विचारली असता, त्यांनी प्रेमलाल सुरजलाल वर्मा (वय ४४, रा. माताटोली) आणि मागे बसलेला अभिषेक विनोदसिंग चंदेल (वय २३, रा. बाजपेयी वार्ड) अशी आपली ओळख सांगितली.पोलिसांनी संशयितांची अंगझडती आणि मोपेडच्या डिक्कीची तपासणी केली असता, डिक्कीत निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत २ किलो २०० ग्रॅम ओला गांजा मिळून आला. पोलिसांनी बाजारभावाप्रमाणे ४४ हजार रुपयांचा गांजा आणि ४० हजार रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपीटर मोपेड (क्र. MH-35/AF-9747) असा एकूण ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत हा गांजा रुपेश शहारे (रा. गणेशनगर) याच्याकडून आणल्याचे समोर आले. याप्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रेमलाल वर्मा आणि अभिषेक चंदेल यांना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य पुरवठादार रुपेश शहारे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, पोलीस उपनिरीक्षक अक्षय चन्नावार, अनिल डोंगरवार, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, दीपक राहांगडाले, निशिकांत लोंदासे, सतीश शेंडे, प्रमोद चव्हाण, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने व पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

