पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमधून ४ लाखांचा गांजा जप्त!
गोंदियात आरपीएफची धडक कारवाई
गोंदिया : रेल्वेमार्गे होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) नागपूर मंडळात मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत रविवारी (१० जून) गोंदिया रेल्वे स्थानकावर पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये टाकलेल्या छाप्यात तब्बल ३ लाख ९८ हजार ६०० रुपये किमतीचा ७.९७२ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात तस्कराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर मंडळाचे रेल्वे सुरक्षा बल आयुक्त श्री. चेतन दिलीपराव जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या रेल्वे गाड्या आणि स्थानक परिसरात अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम (NDPS Drive) राबवली जात आहे. यादरम्यान, १० जून रोजी नागपूर मंडल टास्क टीम आणि आरपीएफ पोस्ट गोंदिया यांना पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस (गाडी संख्या १२८४३) मधून गांजाची तस्करी होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली.
ट्रेन गोंदिया स्थानकावर येताच आरपीएफच्या पथकाने कसून तपासणी सुरू केली. पथकाने कोच क्रमांक एस-०३ (S-03) मध्ये प्रवेश केला असता, इंजिनच्या बाजूला असलेल्या शौचालयाच्या छतावर (टॉयलेट रूफ) एक संशयास्पद चेक्स डिझाईनची बॅग बेवारस स्थितीत आढळून आली. आजूबाजूच्या प्रवाशांकडे चौकशी केली असता, कोणीही या बॅगवर आपला हक्क सांगितला नाही.
आरपीएफ पथकाने पंचांसमक्ष बॅग उघडून पाहिली असता, त्यात गांजाचे ४ खाकी रंगाचे पॅकेट्स आढळून आले. वजन केले असता हा गांजा ७ किलो ९७२ ग्रॅम भरला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे. आरपीएफने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी), गोंदिया यांच्या स्वाधीन केला आहे. जीआरपीने अज्ञात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, हा साठा कुठे पाठवला जात होता, याचा शोध सुरू आहे.
…………..
संशयास्पद वस्तू दिसल्यास ‘१३९’ वर संपर्क करा!
रेल्वे गाड्या किंवा स्थानक परिसरात कोणतीही लावारिस वस्तू, संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास प्रवाशांनी तत्काळ रेल्वेच्या १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ/टीटीई कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

