LatestNewsगोंदियागोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

पवन तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडीतलावाचे पाणी फोडल्याने नागरिक संतप्त

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टंचाईचे संकट गडद

गोरेगाव : येथील ऐतिहासिक पवन तलावातील पाणी मागील ८ ते १० दिवसांपासून कोणत्याही ठोस कारणाशिवाय सोडून दिले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. लाखो लिटर पाणी विनाकारण वाया जात असल्याने आगामी उन्हाळ्यात गोरेगाव शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत जुन्या वस्तीतील संतप्त नागरिकांनी नगर पंचायत अध्यक्ष आणि तहसीलदारांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पवन तलाव हा गोरेगाव परिसरातील भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या तलावात मुबलक पाणीसाठा असल्यास परिसरातील सार्वजनिक विहिरी आणि हँडपंपना वर्षभर पाणी मिळते. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून तलावाची पाळ फोडण्यात आली असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तलावातील पाणी वाहून जात आहे. या प्रकाराने ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी होत असल्याने प्रत्यक्ष दिसून येत आहे. यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी झपाट्याने खाली गेली आहे. याचा सर्वाधिक फटका जुन्या वस्तीतील सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाला बसत आहे. पाणी ही काळाची गरज असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असूनही संबंधित विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ‘एकीकडे शासन पाणी वाचवण्याचे आवाहन करते आणि दुसरीकडे डोळ्यादेखत तलावाचे पाणी वाहून जात आहे, ही मोठी शोकांतिका आहे.या प्रकरणी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तलावाचे पाणी वाहून जाणे बंद करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच, हे पाणी जाणीवपूर्वक फोडले गेले आहे का? याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शिवाय जर वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात निर्माण होणार्‍या पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. 

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *