आदिवासी उपयोजन क्षेत्रात समावेश करा
माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्फत खा.प्रफुल पटेल यांंना निवेदन
तिरोडा (Tiroda News) : ९ मार्च १९९० च्या शासन निर्णयनुसार गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी ही चार तालुके आदिवासी उपयोजन क्षेत्र म्हणून घोषित आहेत. तर उर्वरित तिरोडा, गोंदिया, गोरेगाव व आमगाव यांना यातून वगळण्यात आले आहे. यामुळे अन्याय होत असून या चारही तालुक्यांचा आदिवासी उपयोजन क्षेत्रात समावेश करावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात पाठपुरावा करावा, याकरीता माजी आमदार राजेंद्र जैन यांना निवेदन देण्यात आले आहे.
तिरोडा, गोंदिया, गोरेगाव व आमगाव ही चारही तालुके आदिवासीबहुल, जंगलव्याप्त असून सुद्धा आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये सहभागी नाहीत. त्यामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा विचार करता येथील आदिवासी जनजातीचे प्राबल्य, शिक्षण, आरोग्य, दरडोई उत्पन्न, बेरोजगारी, इत्यादी बाबी लक्षात घेता संपूर्ण गोंदिया जिल्हा आदिवासी उपयोजन क्षेत्रामध्ये सहभागी करून घ्यावा. व जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा तिरोड्याच्या वतीने खा.प्रफुलभाई पटेल यांना माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक संघाचे उमाशंकर पारधी, राजू गुन्नेवार, अरविंद उके, यू.पी.बिसेन, के.एस. रहंगडाले, एन.डी.पटले, शितल कुमार कनपटे, विजय पारधी, रविकिरण ढोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, जि.प.सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े, शैलेंद्र कोचे, रविकुमार (बंटी) पटले व विजय बिंझाडे आदि इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.