नो-एंट्रीत घुसलेल्या यमदूत गॅस टँकरने दुचाकीला चिरडले; रामटेकच्या वृद्धाचा जागीच मृत्यू!
भंडाऱ्यातील साई मंदिर मार्गावरील थरार : अंत्यसंस्काराला जाताना काळाचा घाला; दुचाकी १०० फूट फरफटत गेली, चालक फरार
भंडारा : शहरातील वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी आज भंडारेकरांना पाहावा लागला. शहरात जड वाहनांना बंदी असतानाही नो-एंट्रीत घुसलेल्या एका गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी सुमारे १०० फुटांपर्यंत फरफटत गेली आणि टँकरच्या चाकाखाली चिरडून एका ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही थरारक घटना आज सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास राजीव गांधी चौकालगतच्या साई मंदिर मार्गावरील आसरा वॉशिंग सेंटरजवळ घडली. माणिक आसाराम आग्रे (वय ६२, रा. शिवनगर, रामटेक, जि. नागपूर) असे मृत सेवानिवृत्त ग्रंथपालाचे नाव आहे. तर त्यांचे सोबती सेवकराम भीमराव नागपुरे (वय ४६, रा. शिवाजी वॉर्ड, रामटेक) हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा तालुक्यातील खमारी (बुटी) येथील एका नातेवाईक महिलेचे निधन झाल्यामुळे माणिक आग्रे आणि सेवकराम नागपुरे हे दोघेही रामटेकवरून दुचाकीने (क्र. MH 40 CP 8518) अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. भंडारा शहरातून जात असताना, आसरा वॉशिंग सेंटरजवळील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या गॅस टँकरने (क्र. MH 46 AF 6120) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टँकरने दुचाकीला थेट आपल्या पुढच्या चाकाखाली ओढत शंभर फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यात माणिक आग्रे गंभीर चिरडले गेल्याने त्यांचा घटनास्थळावरच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला. तर सेवकराम हे बाजूला फेकले गेल्याने सुदैवाने बचावले. अपघातानंतर चालक टँकर सोडून घटनास्थळावरून पसार झाला.
……………………………….
बायपास असताना शहरात यमदूत फिरतातच कसे?
तुमसर आणि रामटेक बाजूकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी आयटीआय टाकी परिसरापूर्वीच शहराबाहेरून जाण्यासाठी बायपास रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे. शहरात दिवसा जड वाहनांना प्रवेशबंदी (नो-एंट्री) लागू आहे. असे असतानाही हा अवाढव्य गॅस टँकर शहरातील वर्दळीच्या राजीव गांधी चौकात आणि साई मंदिर मार्गावर घुसलाच कसा? शास्त्री चौक, खामतलाव चौक आणि राजीव गांधी चौकातील वाहतूक पोलीस केवळ वसुलीत मग्न असतात का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. पोलिसांचा वचक असता, तर हा टँकर शहरात आलाच नसता आणि एका निष्पाप वृद्धाचा जीव वाचला असता.
………………………….
अस्ताव्यस्त पार्किंग आणि अतिक्रमणामुळे रस्ते बनले ‘डेथ ट्रॅप’
राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकादरम्यान खाजगी रुग्णालये आणि दुकानांची मोठी गर्दी आहे. अनेक दुकानदारांनी आपले सामान थेट फूटपाथ आणि रस्त्यापर्यंत मांडले आहे, तर ग्राहकांची वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त पार्क केली जातात. यामुळे आधीच अरुंद झालेले रस्ते आता वाहनचालकांसाठी ‘डेथ ट्रॅप’ (मृत्यूचा सापळा) बनले आहेत. या गंभीर समस्येकडे वाहतूक पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने सोयीस्कर डोळेझाक केली असून, आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल, असा सवाल भंडारेकरांनी उपस्थित केला आहे.

