शहिद सुभेदार नेतराम कटरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सालेकसा तालुक्याचा सुपुत्र ‘अमर रहे’चा जयघोष
पिपरिया (सुकाटोला) लोटला जनसागर
सालेकसा (सालेकसा) : भारतीय सीमांचे रक्षण करताना सालेकसा तालुक्यातील पिपरिया (सुकाटोला) येथील सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील सुभेदार नेतराम कटरे यांना हिमाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाले. आज त्यांच्या मूळ गावी पिपरिया येथे हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत आणि ‘शहीद नेतराम कटरे अमर रहे’ अशा गगनभेदी जयघोषात त्यांच्या पार्थिवावर शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देताना संपूर्ण जिल्हा साश्रू नयनांनी न्हाऊन निघाला होता.शहीद नेतराम कटरे हे सन २००१ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. देशसेवेची ओढ असलेल्या नेतराम यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत चोख कामगिरी बजावली आणि सुभेदार पदापर्यंत मजल मारली होती. नुकतेच ते हिमाचल प्रदेशातील सिमला या शहरापासून साधारण २०० किलोमीटर अंतरावर कर्तव्यावर तैनात होते. २० फेब्रुवारी रोजी ते आपल्या वाहनाने सडक मार्गाने जात असताना, पहाडावरील मोठी दरड कोसळून त्यांच्या वाहनावर आली. या भीषण अपघातात सुभेदार नेतराम कटरे यांना वीरमरण आले. ही बातमी त्यांच्या गावी धडकताच संपूर्ण सालेकसा तालुक्यावर शोककळा पसरली होती.आज शहीद सुभेदाराचे पार्थिव विशेष वाहनाने त्यांच्या स्वगावी आणण्यात आले. तत्पूर्वी, गोंदिया, आमगाव आणि सालेकसा या प्रमुख ठिकाणी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काही वेळ थांबवण्यात आले होते. या प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक आपल्या या वीर सुपुत्राचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे होते. ‘जोपर्यंत सूरज चाँद रहेगा, नेतराम तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.पिपरिया येथील अंत्यसंस्काराच्या वेळी भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने त्यांना २१ तोफांची सलामी देऊन विशेष मानवंदना दिली. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी शहीद कटरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यामध्ये आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम, माजी आमदार सहसराम कोरोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले, पोलीस निरीक्षक भूषण बुराडे, उपसभापती जितेंद्र बल्हारे, सरपंच अनिल सोयाम, ग्रामपंचायत अधिकारी वैष्णव यांच्यासह भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आणि जवानांचा समावेश होता.शहीद नेतराम कटरे यांच्या पश्चात त्यांचा परिवार, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असून, त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. देशसेवेसाठी दिलेले त्यांचे हे बलिदान येणार्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

