LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

ज्येष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम यांच्या कवितेला पुन्हा एकदा बहुमान!

‘पावसा पावसा ये ये ये…’ कविता आता चौथीच्या इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट
सालेकसा (गोंदिया) :
धनेगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम-ताराम यांच्या साहित्याला राज्य पातळीवर पुन्हा एकदा मोठा बहुमान मिळाला आहे. त्यांची ‘पावसा पावसा ये ये ये…’ ही लोकप्रिय कविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांनी २०२६ च्या चौथ्या वर्गाच्या इंग्रजी माध्यमाच्या ‘शिकू मराठी आनंदाने’ या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली आहे. नुकतेच बालभारतीचे पत्र आणि पुस्तक कवयित्री उषाकिरण आत्राम यांना प्राप्त झाले आहे.
उषाकिरण आत्राम यांच्या या कवितेला शालेय अभ्यासक्रमात स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१३ मध्ये बालभारतीच्या दुसऱ्या वर्गात आणि २०२२-२३ मध्ये सेमी इंग्रजीच्या तिसऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमातही या कवितेचा समावेश होता. आता चौथ्या वर्गातील इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थीही त्यांच्या या कवितेचा आनंद घेणार आहेत.
ही कविता त्यांच्या ‘एक झोका आनंदाचा’ या प्रसिद्ध बालगीत संग्रहातून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या काव्यसंग्रहाला २००१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा मानाचा ‘वा. गो. मायदेव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांची अनेक बालगीते सह्याद्री दूरदर्शन आणि आकाशवाणी नागपूरवरून प्रसारित झाली असून, आज महाराष्ट्रातील अनेक अंगणवाड्यांमध्ये चिमुकली मुले उषाकिरण आत्राम यांच्या गीतांवर आनंदाने नाचताना-गाताना दिसतात.
साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे असून, त्यांची अनेक पुस्तके विविध विद्यापीठांच्या आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC – २०२६) अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आली आहेत.
उषाकिरण आत्राम-ताराम यांच्या या सातत्यपूर्ण यशाबद्दल साहित्य आणि सामाजिक वर्तुळातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल माणिक गेडाम, लखनसिंह कटरे, विनोद नेवारे, किरण मोरे, नंदकिशोर नेताम, विनोद आत्राम, डॉ. विठ्ठल आत्राम, राजेंद्र मडावी, रमेश कासा आणि पत्रकार संजय बारसे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *