‘वनवासी’ शब्दावरून आदिवासी समाज आक्रमक; कुरखेड्यात भव्य मोर्चा
कुरखेडा ( गडचिरोली ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख ‘वनवासी’ असा केल्याच्या निषेधार्थ कुरखेडा येथे आदिवासी समाजाने बुधवारी भव्य मोर्चा काढला. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा तालुक्यातील ४५ पोटजातींच्या आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत संताप व्यक्त केला.
बिरसा मुंडा चौक (नवीन बसस्थानक) येथून सुरू झालेला मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत ‘आदिवासी’ हा संविधानमान्य शब्द वापरण्याची मागणी केली. दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख ‘वनवासी’ असा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हा शब्द आदिवासी समाजाच्या अस्मितेला धक्का देणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आदिवासी समाज हा जल, जंगल आणि जमिनीशी नाळ जोडलेला मूलनिवासी समाज असून त्यांच्यासाठी ‘आदिवासी’ हाच शब्दप्रयोग करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच ‘वनवासी’ या शब्दप्रयोगाबद्दल गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली. यासोबतच आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी किरण वाघस्कर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनादरम्यान परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चात आमदार रामदास मसराम, आदिवासी समस्त ४५ पोटजाती समाज संघटनेचे अध्यक्ष तिमेश्वर कोरेटी, रामसुराम काटेंगे, डॉ. मेघराज कपूर, शालीकराम मानकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, माधव गावळ, संजय कोकोडे, प्रभाकर तुलावी, गिरीधर तितराम, गोविंद टेकाम, शशिकांत मडावी, दिलीप घोडाम, अरुण सोयाम, प्रभाकर जुमनाके यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

